Home विदर्भ येरे येरे पावसा , तुला देतो पैसा….!

येरे येरे पावसा , तुला देतो पैसा….!

32
0

देवानंद जाधव

यवतमाळ – तालुक्यात पावसाने ऐन मोक्याच्या वेळी डोळे वटारले आहे. अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे वांझ निघाले आहे.शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने अर्थशास्त्र कोलमडून पडले आहे. जे बियाण्यांनी तोंड वर काठले आहे. ते अंकुर पाण्यासाठी आसुसले आहेत. एकंदरीत शेतकर्यांना नाक तोंड दाबून भुक्याचा मार सहन करावा लागत आहे. “येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, “या बालगीतातील पैसा खोटा झाला की नाही माहीत नाही. पण पाऊस माञ मोठा झालाच असावा, पण तेव्हाच्या नि आत्ताच्या भौगोलिक परिस्थितीत जंगल तोडीमुळे आभाळा एवढी तफावत निर्माण झाली आहे. हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. हिरवा शालु पांघरण्यासाठी आसुसलेली धरणी माय, मृगाच्या पहील्याच पावसानं न्हाऊन निघाली खरी, पण तिचं अनुपम लावण्य डोळ्यात भरण्यापुर्वीच पावसा अभावी शेतकरी दुबार पेरणीच्या चक्रव्युहात अडकलाय, त्यामुळे शेतकर्यांच्या मनातल्या कल्पना अश्रुंच्या जलप्रलयात वाहुन गेल्यात, मृगाची चाहुल लागताच शेतकर्यांच्या अंगावर मुठभर मास चढतयं, घरादारात लगीन घाई असते. त्यांच्या मनमोराचा पिसारा फुलू लागतोय, त्यांच्या स्वप्नातील पिकही डोलु लागतयं, पण त्या स्वप्नांना आकार येऊन ती साकार होण्यापुर्वीच यंदाही मुठमातीच मिळालीय त्यामुळे पंचक्रोशीतील तमाम भूमिपुत्रांचा मेंदू बधिर झालाय.बा पावसा…..दरवर्षी प्रमाणे मृगाच्या दिवशी तु सन्मानजनक सलामी दिलीस. फाटलेल्या धोतराच्या फडक्यात शिळीपाळी भाकर भाजी ची शिदोरी घेऊन, बळीराजांनी वावराची वाट धरली. स्वप्नांचं गाठोडं ऊराशी घेऊन बी.बियाण्यांची जुळवाजुळव केली.

बायकोच्या गळ्यातील फुटक्या मणी मंगळसूत्रासह घरादारातील जे विकता येईल ते विकुन, शेतकर्यांचा अवघा मुलुख पेरणी साठी सज्ज झालाय.धरणी मायच्या पोटात बि बियाणं घातलंय. नाजूक अंकुरांनी धरणीवर तोंड काढताच, पावसा तु दडी मारुन बसलास .तूझ्या प्रतिक्षेत डोळे सुजुन गेलेत. कोणतीही दुर्बिण वापरली तरी तुझे दर्शन होत नाही. पाऊस प्रतीक्षेच्या भाकरीवर दुःखाची चटनी आणि अश्रुचं तेल ओतून विरहाचा एक एक घास शेतकरी जबरीने आपल्या घशाखाली ढकलतो आहे. शेतकर्यांच्या आयुष्याच्या सातबार्यावर दुःख ,तळमळ, वेदना, संकट, दारिद्र्य वाढती महागाई, कर्ज, निनिराधारता, न परवडणारे आजार, आदी पाचविलाच पुजलेल्या व्याधीची पेरणी केली आहे. किंबहुना त्याचीच नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांची अवस्था अर्धवट ठेचलेल्या सापासारखी झाली आहे. न येणारा पाऊस आणि दुबार पेरणीच्या संकटाने शेतकर्यांच्या काळजावर आभाळ कोसळले आहे. म्हणुणच शेतकर्यांच्या घराघरात पश्चात्तापाच्या गर्भातुन अश्रूरत्न बाळ॓त होत आहेत.

प्रत्येक शेतकर्यांच्या अंतर्मनात विचारांचे काहूर माजले आहे. स्वतः च्या आणि मुलाबाळांच्या भविष्याची चिंता त्यांच्या मेंदुला पोखरत आहे. भावनाहीन व्यापार्यांनी जिल्हाभर बि बियाणे आणि रासायनिक खतांचा मानवनिर्मित तुटवडा निर्माण केला आहे. कृषी विभागाचे भरारी पथक मुग गीळुन बसले आहे. नवनवीन बि बियाणे, खते, किटक नाशके वापरुन निर्यात केंद्री पिके घेऊन पाहीली, पदरात काय पडले. काळ्या आईचा सारा पोत बिघडुन गेला. किटक नाशकांची सारी प्रतीकार शक्ती किटकांनी खाऊन टाकली
आता आंतरराष्ट्रीय कंपन्या शेतकर्यांसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह स्पर्धेत ऊतरलेल्या आहेत , शेतकर्या च्या बैला विरुद्ध टॅकटर अशी स्पर्धा निर्माण झाली आहे.

त्यामुळे क्रित्येक शेतकर्या च्या जमिनी जातील, अशा निराशेच्या आणि भितीच्या सावटाखाली इथला शेतकरी जगतो आहे. शेतकर्यांना वाटतं आपण एवढे कष्ट सोसले, पण मुलाबाळांच्या भविष्यातील अंधार पुसुन टाकता आला नाही, लेकरां बाळांचे जिवन आणी त्यांचा झालेला भ्रमनिरास याने तमाम भूमिपुत्रांची अवस्था पाण्याविना मास्यासारखी झाली आहे. हे राज्यकर्त्यांना कळु नये याचे या शेतकर्याना काही वाटत नाही. पण बा पावसां…तुला कळु नये, याचं या भोळ्या भाबड्या शेतकर्यांना दुःख वाटतयं. पहील्याच पेरणी ने क॔बरडं मोडलेल्या शेतकर्यांवर, बोगस बियाणे आणि पावसाअभावी दुबार पेरणीचं सुल्तानी, आणि आसमानी संकट आलंय. यवतमाळ तालुक्यातील हिवरी, भांब, बेचखेडा, चांदापुर, बोरी गोसावी, वसंतनगर, साकुर. मांगुळ, तरोडा, बेलोरा, वाई, रुई सह पंचक्रोशीतील तमाम शेतकरी आभाळात डोळे खुपसून बसला आहे. तेव्हा बा..पावसा…तुझ्या स्पर्शासाठी तळमळणार्या, शेतकर्यांना आणि भु तलावरील चराचराला नवसंजीवनी दे, अवघी सृष्टी हिरव्या शालुंनी नटु दे….येरे येरे पावसा, तुला देतो पैसा

Unlimited Reseller Hosting