Home मुंबई सलून , ब्युटी पार्लर व्यवसायिकांची उपासमार थांबवा – चालकांची मागणी

सलून , ब्युटी पार्लर व्यवसायिकांची उपासमार थांबवा – चालकांची मागणी

286

मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन उद्योग मंत्र्याना भेटणार

सुरेश वाघमारे

मुंबई. – लॉकडाउनच्या काळात दुकाने बंद असल्याने सलून व ब्युटीपार्लर व्यावसायिकांची उपासमार होत असून शासनाने आता याकडे लक्ष देण्याची मागणी या संस्था चालकांनी केली आहे. एकीकडे सरकारकडून महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र या क्षेत्रातील लाखो महिलांची आज उपासमार होत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी या संस्थाचालकांनी केली आहे. बोरवली-कांदिवली-दहिसर परिसरातील सलून , ब्युटी पार्लर चालकांनी नुकतीच शिवसेनेचे माजी नगरसेवक , मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन घोसाळकर यांना दिले. याबाबत आपण शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख ,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना भेटणार असल्याची माहिती घोसाळकर यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाइनच्या नावाखाली अनेक सलून असेच ब्युटी पार्लर कर्मचारी घरोघरी जाऊन काम करत असल्याची माहिती या संस्थाचालकांनी दिली. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे आम्ही जगायचे तरी कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या शिष्टमंडळात शिल्पा चौहान,विजया सारस्वत शेखर, रिटा मवानी, हिमा शाह व केया मवानी सहभागी झाल्या होत्या.लॉक डाऊनच्या कालावधीत गेले तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने अनेकांची उपासमार होत आहे. सध्या या व्यवसायात 90% चालक भाडेतत्वावर दुकाने घेऊन व्यवसाय करत असल्याने आता भाडे तरी कसे भरायचे असा सवाल त्यांना सतावत आहे. त्यातच या क्षेत्रात कार्यरत लाखो पुरुष व महिला उत्पन्नाचे साधन नसल्याने त्रस्त झाले आहेत. अनेक संस्थाचालकानी आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिने रेशनिंग तसेच आर्थिक मदतीचा हातभार ही दिला. दरम्यान आता सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून आम्हाला व्यवसाय करू द्या अशी मागणी संस्था चालकांनी केली आहे. कर्मचाऱ्यांची होत असलेली उपासमार थांबविण्यासाठी शासनाने सलून व्यवसायास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.