
देवानंद जाधव
यवतमाळ तालुक्यातील तमाम शेतकर्यांचा मुलुख खरीप पेरणी करण्यासाठी सज्ज झाला आहे. आभाळात डोळे खुपसून पेरणी साठी पावसाची प्रतिक्षा करत आहे. तिफन, जानकुड, ईळत, कासरा, जु, बेड्डी, शिवळा, रुमणे, मुसके ,नांगर, डवरा, वखर, सरते, यासह अन्य शेतीपयोगी साहीत्य पेरणी साठी ठीकठाक करुन ठेवले आहेत.
वर्ष भर शेतकर्यांच्या परिवाराचा भार आपल्या खांद्यावर वाहून येणार्या बैलजोडीला हिरवा चारा, आलप, ढेप, ज्वारी, गहू पिठाचा ऊंडा खाऊ घालुन, त्यांना पेरणीच्या कामासाठी सुदृढ बनवले जात आहे. कापसा साठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कापसासह, सोयाबीन, तुर, ज्वारी, ऊडीद, मुग, बरबटी, सह अन्य पिक घेतले जाते, माञ कधी काळी शेतकर्यांच्या घराघरात पोते भरुन दिसणारी गावरान बाजरी आता शिवारामध्ये दुर्बिण लावली तरी दिसत नाही. संकरित बि बियाणे, आणि रासायनिक खते शेतकर्या च्या माथी मारुन अस्सल गावरान बियाणे ईतिहास जमा केली जात आहे. यंदाच्या अत्यंत निराशेच्या वातावरणात शेतकरी जगत आहे, कापसा सारखे नगदी पिक घरातच पडुन असल्याने, शेतकर्यांना पेरणीच्या बि,बियाणे खरेदी साठी मोठी सर्कस करावी लागत आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली येऊन आत्महत्या करणार्या यवतमाळ जिल्ह्याने आधीच जगाच्या नकाशात, शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून आपले नाव कोरले आहे. कागदी घोडे नाचवुन नेहमी प्रमाणे शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप सातत्याने केले जात आहे. शेतीच्या सातबार्या सोबतच शेतकर्याच्या आयुष्याच्या सातबार्या वर आधीच आभाळभर असलेली दुःखाची नोंद, मानवी मन घायाळ करणारी आहे. सटवीने अवघ्या जगाच्या पोशिंद्याच्या कपाळावरच दुःखाची नोंदणी केली की काय?अशी शेतकर्या ची भावना झाली आहे. तरीही दरवर्षी पोटाला पालव बांधुन जगाच्या पोटाची भुकेची आग शमविण्यासाठी काबाडकष्ट करतो आहे. पेरणी पुर्व तयारी साठी यवतमाळ परिसरातील रुई,वाई, बेलोरा, मांगुळ, तरोडा, गणगाव, भांब राजा, हिवरी, बेचखेडा, चांदापुर, मनपुर, माल म्हसोला सह सर्वञच पेरणी साठी जमिन तयार केली जात आहे. वाई (रुई)येथील युवा शेतकरी भूमिपुत्र कृष्णा वायकर, ऊमेश राऊत, भाविक ठक आपल्या शेतात पेरणी साठी, काळ्या आईची सेवा करुन कष्ट ऊपसत आहेत, जगाच्या अशा पोशिंद्याना सलाम!










































