Home विदर्भ घरासमोरील अतिक्रमणामुळे राठी कुटुंबियांची कोंडी , घरात जाण्यायेण्यासाठी करावा लागतो शेजार्‍याच्या घरातुन...

घरासमोरील अतिक्रमणामुळे राठी कुटुंबियांची कोंडी , घरात जाण्यायेण्यासाठी करावा लागतो शेजार्‍याच्या घरातुन शिडीचा वापर

978

निवेदनावरील कारवाई थंडबस्त्यात , नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

प्रतिनिधि – आरिफ पोपटे

वाशीम – शहरातील देवपेठ भागातील रोहीदास नगर येथील एका विवाहीत महिलेच्या घरासमोर बळजबरीने केलेल्या अतिक्रमणामुळे एकीकडे सदर महिलेला आपल्या स्वत:च्या घरात शिडी लावुन जावे लागत असल्याचे विदारक सत्य समोर असतांना दुसरीकडे अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेल्या अनेक निवेदनांवर नगर परिषदेकडून कोणतीच ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे नगर परिषद प्रशासन आणि अतिक्रमण हटाव पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यापासून ऐन घरासमोरच झालेल्या अतिक्रमणामुळे महिलेची कोंडी झाली असून यासाठी कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न सदर महिलेला पडला आहे.
शहरातील रोहीदास नगर येथे सौ. शोभा धनराज राठी ह्या विवाहीत महिलेचे स्वमालकीचे राहते घर आहे. या घरात त्या आपले पती, दोन मुले व एका मुलीसह मोलमजुरी करुन जगत आहेत. गेल्या चार महिन्याआधी तेथीलच मदन चिंतामण राठी, कन्हैया चिंतामण राठी, भिमराव नामदेव घुगे, संतोष भिमराव घुगे, कैलास भिमराव घुगे या पाच लोकांनी सदर महिलेच्या घरासमोरच अतिक्रमण केल्यामुळे या महिलेला आपल्या घरात जाण्यायेण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शोभा राठी यांच्या शिट नं. ११३, प्लॉट नं. २९९६ क्रमांकाच्या घराच्या नमुना ड मध्ये नकाशात घरासमोरुन पुर्वीपासून जाण्यायेण्याचा रस्ता असल्याचा उल्लेख आहे. हा रस्ता गैरअर्जदारांनी गेल्या चार महिन्यापासून अडविला आहे. त्यामुळे महिला व तिच्या कुटुंबियांना स्वत:च्याच घरात जाणे येणे कठीण झाले असून घरात जाण्याकरीता किंवा पाणी भरण्याकरीता सुध्दा दुसर्‍याच्या घरावरुन शिडी लावून जाणे येणे करावे लागत आहे. घरासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी शोभा राठी यांनी तीन वेळा नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले.

परंतु या निवेदनावर नगर परिषदेकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. दोन ते तीन वेळा अतिक्रमण पथकाने येवून केवळ पाहणी केली. परंतु अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे आपल्याच घरात जाण्यायेण्यासाठी शोभा राठी यांच्यावर प्रशासनाला याचना करण्याची वेळ आली असून नगर परिषद कारवाई करत नसेल तर आपण न्याय कुणाला मागावा असा प्रश्न राठी यांच्यासमोर उभा राहीला आहे. अतिक्रमण हटविले नाही तर आपल्याला आत्मदहनाशिवाय मार्ग उरणार नाही अशी भावना शोभा राठी यांच्याकडून व्यक्त होत आहे.