
नांदेड, दि.२४ :- राजेश एन भांगे – शिव संस्कृतीचे प्रचारक तथा शैवपंथाचे गुरु श्री निर्वाण रुद्र पशुपती महाराज नागठाणेकर यांच्या हत्येची माहिती कळताच नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलिकर यांनी उमरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात जावुन पार्थिवाचे दर्शन घेतले व आदरांजली वाहिली. तसेच मारेकऱ्यांवर लवकरात लवकर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा पोलिसाधिक्षक विजय कुमार मगर यांना दिले.

शिवसंस्कृतीचे प्रचारक तथा शैवपंथाचे गुरु श्री निर्वाण रुद्र पशुपती महाराज नागठाणेकर यांची रात्री दोनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.
हल्लेखोर हे मठात घुसून मारत असतील तर ही बाब खुपच गंभीर आहे. नेमकं कारण काय आहे हे तपासाअंती निष्पन्न झाले पाहिजे. साधु-संत आणि धर्मप्रचारकांवर मग तो कुठल्याही धर्माचा व पंथाचा प्रचारक असु देत. साधु-संतावर होणारे हे हल्ले केवळ दु:खदच नव्हे तर ते चिंताजनक व संतापजनक आहेत. या बाबतीत महाराष्ट्र राज्य शासनाने गंभीर पाऊले उचलली पाहीजेत अशी भावना यावेळी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलिकर यांनी व्यक्त केली व मी या हल्ल्याचा तिव्र निषेध करतो आणि पूजनीय स्वामीजींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो असेही त्यांनी म्हटले.











































