Home जळगाव नागरीकांच्या सहकार्यामुळे पाचोरा तालुका ग्रीन झोनमध्ये येईल

नागरीकांच्या सहकार्यामुळे पाचोरा तालुका ग्रीन झोनमध्ये येईल

182

प्रशासनाच्या उपाययोजनांवर पाचोरा येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान

निखिल मोर

पाचोरा – लोकप्रतिनिधींची समन्वयाची भूमिका, तालुका प्रशासनाच्या चांगल्या उपाययोजना व त्यास नागरीकांची भक्कम साथ यामुळे पाचोरा तालुका निश्चितपणे ग्रीन झोनमध्ये येण्यास मदत होईल. अशा आशवाद आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
येथील तहसील कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, डॉ.भूषण मगर, तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, गटविकास अधिकारी श्री. सनेर, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, किशोर बारावकर आदि उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस तहसीलदार चावडे यांनी तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. तर डॉ. समाधान वाघ यांनी कोरोना परिस्थितीची माहिती दिली. पाचोरा येथील रुग्णालयातील अपूर्ण कर्मचारी, तसेच उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नगरपालिकेला निधीची मागणी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केली. यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी तालुक्याला उपलब्ध करुन देण्यात येतील असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
पाचोऱ्यात कोरोनाचे रुग्ण आढळताच नागरीकांनी तालुक्यात स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यु पाळल्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांच्यातील समन्वय चांगला आहे. तालुक्यातील प्रत्येक नागरीक हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना योध्दा म्हणून काम करीत आहे. पोलीसांच्या मदतीला तालुक्यातील 75 पेक्षा अधिक माजी सैनिक मदत करीत आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी तालुकावासियांचे कौतुक केले.

भडगाव येथे आढावा बैठक संपन्न

पाचोरा येथील बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी भडगाव येथेही आढावा बैठक घेतली. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भडगाव तालुक्यास लागणारी साधनसामुग्री व औषधींची कमतरता भासू देणार नाही. भडगाव येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या समन्वयाने तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही. याबद्दल पालकमंत्र्यांनी तहसीलदार माधुरी आंधळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलिस निरीक्षक येरुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील, सुचिता पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे व पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर भविष्यात तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सुचना दिल्यात.