Home विदर्भ डायटच्या ऑनलाईन शिक्षणात रमले विद्यार्थी , अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग.

डायटच्या ऑनलाईन शिक्षणात रमले विद्यार्थी , अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग.

135

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

मोटू-पतलू, छोटा भीम, डोरेमनमुळे संकेतस्थळ झाले आकर्षक

तज्ञ मार्गदर्शकांनी केली साहित्याची निर्मीती

वर्धा, दि 7 मे – कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शिक्षण क्षेत्रही प्रभावित झाले आहे. लॉकाडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था( डायट) व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने 10 एप्रिल पासुन जिल्हयात ऑनलाईन गृह शिक्षण ( Learn From Home ) उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २ लाख ५३ हजार १४२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवून ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
राज्यभरातील शाळा आता नविन आदेशानुसार 17 मे पर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील सातत्य कायम राहावे, यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लर्न फ्रॉम होम ही संकल्पना मांडली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासक्रमाचा हा उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरु झाला आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) ही गुणवत्तेसाठी काम करणारी वर्धा जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली डायटने लर्न फ्रॉम होमसाठी विद्यार्थ्यांना घरबसल्या सोडविण्यासाठी आवश्यक अभ्यास साहित्य संस्थेच्या वतीने www.dietwardha.com या संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या समन्वयाने जिल्हा स्तरावर विषय साधन व्यक्ती व शिक्षकांचा विशेष कृती गट स्थापन केला. या कृती गटाच्या मदतीने लर्न फ्रॉम होम अंतर्गत जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले अभ्यास साहित्य संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिले. जिल्हयातील आठही तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही जिल्हयातील विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरु आहे.

*संकेतस्थळाची वैशिष्टे*

विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातुन हसते-खेळते शिक्षण देण्याचा प्रयत्त्न डायटच्या शिक्षकांनी केला आहे. वेबसाईटवर आकर्षक कार्टून ,छोटा भीम, मोटू-पतलू, शिवा, डोरेमन अशी मुलांच्या भावविश्वातील चित्र व व्हीडीओज आहेत. त्यामुळे संकेतस्थळ आकर्षक होण्यासोबतच व विद्यार्थ्यांना गुतवून ठेवण्यात आणि सहज, सुलभ शिक्षण देण्यात यशस्वी झाले आहे. यासाठी कुठलेही अँप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.
या संकेतस्थळावर इयत्ता 1 ली ते 10 वी च्या संपूर्ण विषयाच्या उत्तम चाचण्या उपलब्ध आहेत. तसेच इयत्ता 11वी व 12 वी साठी काही विषयांच्या चाचण्या सुदधा देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या अभ्यासमाला या संकेतस्थळावर जोडल्या आहेत. विविध विषयांवर ‘क्वीझ सोडवा सर्टिफिकेट मिळवा’ हा प्लॉटफॉर्म उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक सामान्य ज्ञान विषयाच्या परीक्षा यावर सोडवण्यात मजा येत आहे. इयत्ता 1 ली ते 5 वी साठी इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित बॉम्बे कम्युनिटी पब्लीक ट्रस्ट (BCPT) या संस्थेने तयार केलेले अॅनिमेटेड शैक्षणिक व्हिडिओज उपलब्ध करून दिल्यामुळे मुलांमध्ये आवड निर्माण होण्यास मदत होत आहे. विविध स्पर्धा, शैक्षणिक गेम, टास्क, आणि बरेच काही फक्त एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
एस.सी.ई.आर.टी (SCERT) पुणे निर्मीत दिक्षा ॲप (DIKSHA – APP ) अंतर्गत रोजची अभ्यासमाला व प्रश्नमंजुषा यांची संकेतस्थळावर रोज अद्यायावत माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणी विद्यार्थ्यांमधील उपजत कलागुणांना अभिव्यक्त करण्याची संधी सुदधा यावर दिली आहे. लॉकडावूनमध्ये कुठेही बाहेर न जाता विद्यार्थ्यांना आवड असलेल्या कलागुणाचा व्हिडीओ घरीच तयार करून यावर अपलोड करण्याची सुविधा सुदधा उपलब्ध आहे. तसेच याची स्पर्धा सुदधा घेण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी आतापर्यत एकूण 1 लक्ष 98 हजार 497 चाचाण्या सोडवल्या आहेत. तालुका निहाय विद्यार्थ्यानी सोडविलेल्या ऑनलाईन टेस्टची संख्या : वर्धा – 68217, सेलू – 21641, देवळी – 17013, हिंगणघाट – 31214, समुद्रपूर – 14004, आर्वी – 21993, आष्टी – 10044, कारंजा- 14371 अशी आहे.
उपक्रमाची उपलब्धी संकेत स्थळावर 322 ई- साहित्य उपलब्ध आहे. संकेत स्थळाला 2 लाख ५३ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. जिल्हयातील 2 लाख 20 हजार 552 विद्यार्थ्यांनी घरबसल्या ई- साहित्याचा वापर केला. दररोज 15 हजार भेटी दिल्या जात आहे. ईयत्ता 1 ली ते 12 वी पर्यतचे सर्व विद्यार्थी संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन प्रश्न सोडवित आहे. दिक्षा ॲप (DIKSHA app) वरील ई-साहित्य वापरण्यात वर्धा जिल्हयाचा महाराष्ट्रात क्रमांक तिसरा आहे. या संकेत स्थळावर बाहेरील जिल्हयातील विद्यार्थी सुदधा सहभागी होत आहेत
*रत्नमाला खडके, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा*.
मुलांच शिक्षण बंद होवू नये म्हणुन डायटची प्राचार्य म्हाणून आणि लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार हा उपक्रम सुरू केला आहे याला जिल्हयातूनच नव्हे तर इतर जिल्हयातून सुदधा प्रतिसाद मिळत आहे. या संकेतस्थळावर आतापर्यत २ लाख ५३ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक साहित्याचा उपयोग केला आहे.. या संकेस्थळावर डोरेमनच्या माध्यामातुन विद्यार्थ्यांनी अतिशय बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिक्षण सहज सुलभ झाल्यामुळे विद्यार्थी खुष आहेत. रोज नवीन 50 चाचण्यांची भर पडत आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत संपूर्ण साहित्याची निर्मिती होत असुन विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या योग्य सूचना व प्रतिक्रियाचा विचार केला जातो. मुख्य म्हणजे संकेतस्थळावर कोणत्याही जाहिरातीचा अडथळा विद्यार्थ्यांच्या शिकण्यात निर्माण होत नाही. विद्यार्थी व पालकांच्या शंका निरसनासाठी हेल्प लाईन क्रमांक सुदधा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उपक्रम यशस्वितेसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याद्यापक, तसेच डायटचे सर्व अधिकारी, विषय साधन व्यक्ती, शिक्षक , जिल्हयातील तंत्रस्नेही शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक व शिक्षणप्रेमी यांनी परिश्रम घेतले आहे.
मनीषा सावळे जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा