Home विदर्भ COVID19 कोरोनाच्या लढाईत “आम्ही” का नाही ?

COVID19 कोरोनाच्या लढाईत “आम्ही” का नाही ?

130
0

मनिष गुडधे

अमरावती – संकटाच्या काळात वैरीही धावून येतो ही आपली परंपरा आहे. परंतु कोरोनाच्या महामारीत ही अमरावतीतील लोकप्रतिनिधी आपापले अजेंडे खुंटीला टांगून एकजुटीने काम करण्याऐवजी एकमेकावर दोषारोप करण्यात मश्गुल असल्याचे चित्र आहे. ही बाब संसदीय परंपरेला तिलांजली देणारी तर आहेच. परंतु, सध्याच्या राजकारणात आढळून येणाऱ्या ‘डीविसीव पालिसी’ ला बळ देणारी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला तर खिळ बसतोच उलट कोरोना महामारीच्या नियोजनातही अडथळे निर्माण करते. याचे भान ज्या लोक प्रतिनिधींनी ठेवावे अशी अपेक्षा आहे. तेच जर एकमेकांची तोंडे विरुद्ध दिशेला ठेवून राजकारण करत असतील तर जनतेने कुणाकडे पाहून कोरोनाचा सामना करावा? संकटाच्या समयी प्रशासनाला राजकारण्यांच्या प्रोएक्टीव सहकार्याची गरज असते. फ्रंट लाईन वारीयर्सवर हल्ले होताहेत. त्यांचेही मनोबल ढासळले तर? कोरोना संकट अमरावती जिल्यात घोंघावत आहे तेव्हापासून तर आजवर जिल्ह्याच्या राजकारण्यांनी एकत्र येवून या संकटाचा सामना करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. उलट पत्रकबाजी सुरु आहे.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर, राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा, आमदार सुलभाताई संजय खोडके, आमदार बलवंत वानखड़े, आमदार राजकुमार पटेल, आमदार देवेन्द्र भुयार, आमदार प्रताप अडसड, हे जिल्ह्याचे नेतृत्व करतात. साध्या भाषेत बोलायचे झाले ते धुरकरी आहेत. ज्यांच्याकडे जिल्ह्याची धुरा आहे. त्याच धुरकऱ्यांची तोंडे जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेलाच राहतील तर जिल्ह्याच्या विकासाच सोडा कोरोना संकटातून तरी जिल्हा लवकर बाहेर पडणार आहे का?

प्रश्न केवळ कोविद१९ चाचणी केंद्राचाच आहे का ?

राज्यात कोविद१९ चाचणी केंद्र केवळ पुणे, मुंबई. नागपूर येथेच असल्याने उपचार कसा करावा हा प्रश्न होता. त्यामुळे अमरावती सारख्या ठिकाणी चाचणी केंद्र आल्यास इलाज करायला सोपा होईल. म्हणून तशी मागणी झाली. त्याला उद्धव ठाकरे सरकारने लगेच मंजुरात दिली. आता लवकर चाचणी केंद सुरु होईल अशी अपेक्षा असताना ते विध्यापिठात कसे? येथपासून ते न्यायालयीन लढाई पर्यंत या चाचणी केंद्राने मजल मारली. शेवटी ४ मे ला याकेंद्राचे उद्घाटन झाले. तोवर ‘मी’ कसा या केंद्रासाठी प्रयत्न केला याचीच री मिरवण्यात धन्यता मानणाऱ्या नेत्यांची गैरहजेरी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कायम राहिली. आपल्या जिल्ह्यात बी.टी. देशमुखासारखे संसदीय राजकारणाचे अभ्यासक नेते शहरात आहे. डॉ.सुनील देशमुख, डॉ.अनिल बोंडे, प्रवीण पोटे, जगदीश गुप्ता सारखे माजी पालकमंत्री आहेत. यातील दोन माजी पालकमंत्र्यांची पार्श्वभूमी तर वैद्यकीय व्यवसायाची आहे. डॉ. देवीसिंग शेखावत साहेब आहेत.संजय खोडके आहेत, माजी आमदार अरुणभाऊ अडसड, प्रा. वीरेंद्र जगताप, माजी मंत्री सुरेंद्र भुयार आहेत. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सर्वाना सोबत घेवून नियोजन करून कोरणाचा संकट करा. भारताला स्वातंत्र्य मिळाल तेव्हा कॉंग्रेस पक्षाचेच सरकार आले असते. परंतु देश चालवायचा तर सर्वांच्या सहकार्याने म्हणून ‘राष्ट्रीय सरकार’ स्थापन केले होते. कोरोना संकटाच्या काळात राष्ट्रीय सरकार सारखी भूमिका जिल्ह्यात सर्वांनी वठवावी. कुठल्याही कामाचे श्रेय हे सत्ताधार्यांना जाते हा स्वाभाविक नियम आहे.परन्यू त्यातही सत्तेतील कोणाकडे हा प्रश्न निर्माण झाला तर ?तो होऊ नये.

आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. संसदीय लोकशाही हा शासनाचा एक प्रकार आहे. या शासन व्यवस्थेत काही परंपरा निर्माण केल्या, आपली स्वतंत्र संसदीय भाषा निर्माण केली. संसदीय लोकशाहीत सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर डोळ्यात अंजन घालून देखरेख करणारा आणि प्रसंगी सत्ताधार्यांना नामोहरम करणारा विरोधकाची भूमिका महत्वाची आहे.त्यासाठी संसदीय आयुधे आहेत. परंतु, संकटाच्या वेळीही तसेच वागायचे का ? संकटाच्या काळात तरी संसदीय परंपरेचा मान ठेवून सत्ताधारी विरोधकानी एकदिलाने काम करावे अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात जुन्या मंडळीकडे नजर फिरवल्यास आपल्याला दादासाहेब गवाई, प्रा. राम मेघे, डॉ. देवीसिंग शेखावत ,प्रा बी.टी. देशमुख , सुदामकाका देशमुख, वसुधाताई देशमुख यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. यांचे पक्ष वेगळे, विचारधारा हि वेगळी होती. त्यांच्यात तात्विक मतभेद नव्हते असेही नाही, मतभेद होते. परंतु, जिल्ह्याच्या विकास कामाचा प्रश्न आला की, बी.टी.देशमुख, दादासाहेब गवई, देवीसिंग शेखावत, प्रा. राम मेघे, सुदामकाका देशमुख एकत्र येत असल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. कारण त्यांच्यात काही तात्विक मुद्द्यावर वाद असले तरी सुसंवाद कायम होता. आताच्या राजकारणात तो सुसंवादच हरवला असल्याची जाणीव पावलोपावली दिसून येते.

लोकशाहीत वाद असावेत परंतु सुसंवाद तुटता कामा नये. चर्चा ‘डायलॉग’ यावर लोकशाही आधारित आहे. वाल्टर बेगहोटने लोकशाहीची व्याख्याच ‘चर्चेवर आधारित शासन म्हणजे लोकशाही’ अशी केली आहे. चर्चा हा लोकशाहीचा प्राणवायू आहे. आपण चर्चेचा प्राणवायुच काढून घेतला तर सुसंवादाला जागाच उरणार नाही. हा लेख लिहित असताना कार्लमार्क्सच्या द्वंदात्मक भौतिकवादाची आठवण झाली. योगायोगाने आज त्याची जयंती आहे. कार्लमार्क्सने त्याच्या द्वंदात्मक भौतिकवादाचा सिद्धांत मांडताना म्हटले कि, माणसाच्या मनात एखादा विचार येतो त्याला वाद म्हणतो. त्याविचारांच्या विरोधी दुसरा विचार निर्माण होतो त्याला प्रतिवाद म्हणतात. वाद आणि प्रतिवादातील संघर्षांतून जो समन्वय निर्माण होतात त्यास संवाद असे म्हणतात. संवादाने मानवी जीवनात परिवर्तन घडून येते. त्यामुळे वाद असला तरी आपल्यातील संवाद कमी होता कामा नये.

कोरोना विषाणूने जगभर घातलेले थैमान पाहता त्या संकटाचा एकजुटीने सामना करण्यासाठी लोक प्रतिनिधींची भुमीका अत्यंत महत्वाची असते. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र बसून कोरोना संकटाचा सामना करणे हेच अपेक्षित आहे. अमरावतीतील या सर्व आजी माजी लोक प्रतिनिधींनी आणि काही सुजाण मंडळींनी जिल्हाधिकारी कार्यालयात रोज एकत्र येवून कोरोना संकटाचे मोनीटरिंग करावे. एकाने मायग्रेट मजूर, विध्यार्थ्यांचा प्रश्न हाताळावा. दुसऱ्याने वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी व उपाय, तिसऱ्याने पोलीस यंत्रणा. चवथ्याने मनपा नगरपालिका काहींनी ग्राम पंचायत क्षेत्र अश्या रीतीने कामाची विभागणी करून एकोप्याने काम केले तर आणि तरच आपण कोरोनाला लवकर हरवू शकतो. नेत्यांच वागण हे केवळ त्यांच्या पुरत राहत नाही तर ते गाव खेड्यात / वार्डातील कार्यकर्त्यापर्यंत झिरपते. तीच लागण त्याला लागल्याने तोही तसा वागतो हे लक्षात घ्या. त्या कार्यकर्त्याला तुम्ही एकदिलाने काम करताना दिसले कि तोही आत्मविश्वासाने पुढे येतो.

यशोमतीताई, नवनीत राणा, सुलभाताई खोडके सहसा एकत्र येताना दिसून येत नाहीत. (नाही म्हणायला नियोजन बैठका, आढावा बैठकांना सोबत असतात) संकटाच्या काळात आम्ही एकत्र असल्याचा संदेश तर द्या बघा. जनता कशी सुखावते. विरोधकांकडे, माजीमंत्री, आमदार लोकप्रतिनिधीकडे सत्ता नसली तरी त्यांचेकडे अनुभवाची शिदोरी असते. त्यांच्या अनुभवाचा, तर्काचा, तथ्याचा लाभ घ्या. आपल्याकडे तर वैद्यकीय क्षेत्रातील दोन माजी पालकमंत्री आहेत. यशोमतीताईंनी पुढाकार घेत बी.टी.सर, प्रभाकरराव वैद्य यांची भेट घेवून जो पायंडा पडला. ‘इट्स अ गुड थॉट’ परंतु त्याचा दायरा वाढवून सर्वाना एकत्र बोलवा. वार रूम तयार करा, जिल्ह्याला कोरानाच्या संकटातून ‘’मी’’ नाही “आम्ही” मुक्त केल्याचा संदेश जिल्ह्यात जाऊ ध्या. अन्यथा कोरोनाला हरविण्यापेक्षा आपणच आपल्याला हरविल्याशिवाय राहणार नाही. कोरोना काही जात, धर्म, पंथ, पक्ष पाहून येत नाही. हा लेख लिहून संपण्याच्या मार्गावर असताना एका माजी मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आहे. . राजकारण्यांचे काही धुऱ्या- धुऱ्याचे भांडण नसतात / नाहीत / नसावेत. राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू नसतो. हे सध्याच्या आघाडी सरकारच्या स्थापनेने सिद्ध केले आहे.

धम्मपदातील यमकवग्गात एक गाथा आहे.
“मला अपमानिले, माझा शेवट केला, मला जिंकले, जे असे वैर धरतात, त्यांचे वैर कधीच संपत नाही.” त्या विचारातून बाहेर पडत कोरोनाचे युद्ध ‘ मी ’ जिंकणार असे म्हणण्यापेक्षा ‘ आम्ही ’ जिंकू म्हणा !