Home विदर्भ विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्यातील कोरोना तयारीचा आढावा.!

विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्यातील कोरोना तयारीचा आढावा.!

156

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा, दि 23 :- नागपूर विभागात नागपूर वगळता सर्व जिल्हे सध्या ग्रीन झोन मध्ये आहेत. पण कोरोनाचा रुग्ण कधी सापडेल हे सांगता येत नाही. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी आज वर्धेतील कोरोना तयारीची पाहणी करून आढावा घेतला.


कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथील कोरोना केअर सेंटर आणि सावंगी रुग्णालयाची पाहणी केली. सेवाग्राम येथे प्रत्येक बारीक-बारीक आणि तांत्रिक बाबीची त्यांनी माहिती घेतली. डॉक्टर ,नर्स यांच्याशीही चर्चा करून त्यांना जाणवणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. तेथील अलगिकरण कक्ष, व्हेंटिलेटर वार्ड, प्रयोगशाळा याची पाहणी केली. यावेळी सेवाग्राम रुग्णालयाने पॉवर पॉईंट सादरीकरण केले. सेवाग्राम रुग्णालयाने केलेल्या तयारीबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सावंगी येथील रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुमारे 800 बेडच्या अलगिकरण कक्षाची, टेस्टिंग प्रयोगशाळा, याची पाहणी करून अधिक्षकांशी चर्चा केली.
आय टी आय टेकडीवर असलेल्या 4 कोविड सेंटरची सुद्धा त्यांनी पाहणी केली. न्यू इंग्लिश शाळेतील मजुरांशी त्यांनी संवाद साधला. त्यांना काम देण्यात येईल मात्र जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत त्यांना इथेच थांबावे लागेल, याबाबत त्यांचे समुपदेशन केले. रोटरी क्लब ने उभारलेल्या भाजी बाजाराची सुद्धा त्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी जिल्ह्यातील धान्य वाटप, केलेली कारवाई, दाखल झालेले गुन्हे, आणि सुरू झालेल्या कामांची माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते.