Home मराठवाडा मास्क, सोशल डिस्टन्सिंग नसल्यास दंड,कोरोनाला हरविण्यासाठी धर्माबादकरांनी स्वंयशिस्त पाळण्याची गरज

मास्क, सोशल डिस्टन्सिंग नसल्यास दंड,कोरोनाला हरविण्यासाठी धर्माबादकरांनी स्वंयशिस्त पाळण्याची गरज

64
0

नांदेड, दि.२३ ( राजेश भांगे ) – धर्माबाद, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता रस्त्यावर थुंकणारे, तोंडाला मास्क व रुमाल न वापरणारे, तसेच सोशल डिस्टन्स न ठेवणे अशांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी घेतला आहे. ही दंडात्मक कारवाई गुरुवारी (ता.२३) पासून केली जाणार असल्याचा आदेश सोमवारी काढण्यात आला आहे.

कोरोना आजाराने देशात थैमान घातले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात व धर्माबाद सीमेलगत तेलंगणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. खबरदारी म्हणून नागरिकांना सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. धर्माबाद नगरपालिकेकडून शहरात ठिकठिकाणी तीन चार वेळा निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. तसेच पालिकेकडून विविध उपाययोजना राबविले जात असताना आता सार्वजनिक ठिकाणी वावरण्याबाबत नगराध्यक्षा अफजल बेगम अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी चर्चा करून दंडात्मक कारवाई करण्यासाठी आदेश काढण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध, मास्क व रुमाल न वापरणाऱ्या आणि सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या विरुद्ध दंडात्मक फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिला आहे. याबाबत शहरात जनजागृती करण्यात आली असून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क व रुमाल न वापरणाऱ्यास २०० रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे २०० रुपये दंड तसेच सोशल डिस्टन्स (सामाजिक अंतर) न ठेवणे ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यावेळी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सहा पथके नियुक्ती केली आहेत.

” सुदैवाने आतापर्यंत धर्माबाद शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. नगरपालिकेचे सर्वच अधिकारी व कर्मचारी कोरोनाला हरविण्यासाठी अहोरात्र लढा देत आहेत. कोरोनामुक्त शहर ठेवण्यासाठी मास्क व रुमाल न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तरी धर्माबादकरांनी स्वंयशिस्तता पाळुन सहकार्य करावे असे अवाहन मंगेश देवरे, मुख्याधिकारी धर्माबाद यांनी केले.