Home महत्वाची बातमी कोरोनात रक्ताची नाती दूर गेली..पण कर्तव्यांच्या नात्यांनी माणुसकी जपली…

कोरोनात रक्ताची नाती दूर गेली..पण कर्तव्यांच्या नात्यांनी माणुसकी जपली…

271
0

*कोरोनात रक्ताची नाती दूर गेली..पण कर्तव्यांच्या नात्यांनी माणुसकी जपली…*

कोरोना आला आणि सगळ्या नात्यांचे संदर्भच बदलून गेले.आज कोरोना आणि मास्क हे समीकरण घट्ट झालय.मास्क घालणे खूपच आवश्यक आहे हे खरे आहे.या जीवघेण्या संसर्गाचा संसर्ग मास्क घातल्याने टाळता येतो.पण या काळातील काही घटना बघता माणूस माणसाला टाळत आहे हे विदारक चित्र ही समोर येते आहे.नात्यातील हा दुरावा चिंता निर्माण करणारा आहे. कोरोनाने नात्यातला पोकळपणा उघड होतोय.मास्कचा खराखुरा अर्थ कोरोनाने जाणवून दिलाय. मास्कचा दुसरा अर्थ मुखवटा असाही होतो. मनापासून विचार करून सांगा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर होतोय की ओळख लपणवण्यासाठीही मास्क उपयोगी पडतोय. समोरा समोरून जाणार्या घसटीतील दोन व्यक्तीही लांबूनच हं असा हुंकार आतल्या आत करून दूर जाताहेत. बहुतेकांना आज एकाच संशयाने पछाडलय, याच्या अंगावर कोरोनाचे विषाणू असतील काय? सरकारने सोशल डिस्टन्स करून खबरदारी घ्यायला सांगितली आहे.पण मानव हे अंतर पार करून कधीच पुढे गेलाय. अशा घटना अनुभवास येत आहेत. मला मुंबईवरून जवळच्या एका पाहुण्याचा फोन आला.आम्हाला गावाकडे यायचं आहे. इथून बाहेर पडायची काही तरी सोय करा. बिचारे रोज एक अडचण सांगायचे.आमची बिल्डींग जवळपास पूर्ण खाली होत आली आहे.फारच कमी लोक रहायला आहेत. तेही कधी जातील हे सांगता येत नाही. पाहुण्याच्या गावाकडूनही फोन येत होते. तुम्ही काहीही करा खरं त्याना मुंबईतून बाहेर काढा.आम्हाला खूप चिंता वाटत आहे.मला काय करावे हे कळेना.मी मुंबईत बरीच फोनाफोनी केली. त्यांना गावाकडे कसे आणता येईल यासाठी मदतीची विनंती केली.पण लाॅकडाउनमुळे अशक्य आहे हे प्रत्येकजण सांगू लागला.माझा पीए आदिनाथलाही सांगितले.यानेही प्रयत्न केला.पण कुठे काही जमेना.इकडे पाहुणा काही शांत बसेना.त्याने आता नवीनच संकट उभे केले.त्यांच्या छोट्या मुलीला फोनवर बोलायला लावायचे. ती निष्पाप मुलगी गोंडस आवाजात म्हणायची बाबा आम्हाला गावाकडे घेवून जायला गाडी कधी पाठवणार? मला काळजात कसनुस व्हायचं. तजवीज करण्यात दोन दिवस गेले आणि एके दिवशी संध्याकाळी ७ वाजता फोन आला. आमच्या बिल्डींगमधे २ करोना पाॅझिटीव्ह रूग्ण सापडलेत. बिल्डींग सिल केली आहे. मला वाईट वाटले.दुसर्या दिवशी पाहुण्याच्या सासूचा फोन आला.जावईबापू राहत्यात त्या बिल्डींगमधे करोना आलाय म्हणे.आता थोडे दिवस जावईबापू आणि पोरगी आहे त्या ठिकाणीच राहू देत.मला धक्काच बसला. जावईबापू, मुलगी आणि नात गावाकडे यावेत म्हणून गेले चार पाच दिवस ज्यांचा जीव खालीवर होत होता.त्यांनी आता आहे तिथेच राहण्याचा सल्ला दिला होता.कोरोनामुळे मायेचा झरा झटकन आटला होता.एरव्ही जावईबापूचा किती मान राखला जातो.त्याची मर्जी सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो.दोन मुलाची आई झाली तरी सगळ्या आया आपली मुलगी अजून लहान असल्याप्रमाणे लाडीगोडीच्या भाषेत विचारपूस करीत असतात. कांदा कापताना जरा बोटाला खरचटले तरी आई कळवळते.कोरोनाचा हाॅटस्पाॅट झालेल्या मुंबईत राहणार्या मुलींना बहुतेक एकच आशिर्वाद भरभरून मिळत आहे. दिल्या घरी सुखी रहा.एकीकडे टीव्हीवर नात्यांचा उत्सव दाखवणार्या मालिका चोवीसतास दाखवल्या जात आहेत.पडद्यावर आई बाप,बहिणभाऊ,नवरा बायको,प्रियकर प्रेयसी ही नाती किती छानपैकी जपली जाताहेत.नात्यात दुरावा आला चटकन डोळ्यात पाणी येतंय.एकमेकांची नाती जपण्यासाठी जिवापाड प्रयत्न केला जातोय.अलंकारीक शब्दाने नाती गुंफली जाताहेत.फुलासारखी नाजूक रक्ताची नाती जन्मोजन्मीच्या शपथा घेतलेली मायेच वात्सल्य…पितृॠण मनाच्या खोल डोहात रूतून बसलेली वगैरे वगैरे.आता हल्ली लाॅकडाउनच्या काळात वेळ असल्याने मीही या मालिकेत अधूनमधून डोकावतो.छोट्या पडद्यावरील हा शब्दांचा पोकळ डोलारा बघितला की हसू येते. तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये अपार्टमेंटमधील रहिवासी किती धमाल जीवन जगतात.आणि आता वास्तवात शेजारचे रहिवासी तोंडाला मास्क बांधून गच्चीत राहूनच टेक केअरचा कोरडा आशिर्वाद देताहेत.कोरोनाने नात्यातील जगण्याचा रसच शोषून घेतला आहे.अशीच एक मन खिन्न करणारी बातमी वाचायला मिळाली.मुंबईत राहणार्या एका सुनेला कोकणात सासरी जायचं होते.नवरा सैन्यदलात लांब नोकरीला.मुंबईत एकटी राहणार्या त्या सुनेला कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने कोकणातील लहानशा खेड्यात आपल्या सासरी परतायचे होते.आपल्या नात्यात सुरक्षित राहता येईल या भावनेने सुनेने पोलिसांची परवानगी काढली.नवरा सैन्यदलात असल्याने परवानगी मिळाली.पोलिस बंदोबस्तात तहसीलदारांनी मुलीला लहानशा बाळासह काळजी घेवून सासरी गावी आणलं.पण सासरच्या लोकानी सुनेला दारातूनच परत पाठवले. तहसीलदारांची विनंतीही धुडकावून लावली.सुनेला काहीही झाले नाही हा विश्वास देवूनही त्या सुनेला घरात प्रवेश मिळाला नाही.इतकेच नव्हे तर स्वतःच्या नातवाला दूधसुद्धा तापवून दिले नाही.तहसीलदांरानी त्या सुनेला जिल्हा रूग्णांलयात आणून तीची राहण्याची व्यवस्था केली.अशी कितीतरी उदाहरणे समोर येताहेत.नात्यातील अमानुषतेची काळी बाजूही कोरोनाने समोर आणली आहे.संवेदनशीलतेची कातडी निबार होत चालली आहे.कोरोनाचा विषाणू फक्त शरीरातच शिरला नाही तर मनातही शिरून नाती पोखरत आहे.घराला… घूस… लागल्यावर इमारतीचा पाया पोकळ होवून खचतो.या विषाणूने नात्यांची मजबूत बांधणी किती पोकळ आहे हे दाखवून दिलय.आजच एक बातमी वाचायला मिळाली.लाॅकडाउनमुळे मुंबईत राहणार्या तीन मुलांना गावी ह्रदयविकाराने वारलेल्या बापाचे अंतिमदर्शन घेता आले नाही.तिघांनीही मोबाईलमधील व्हिडिओ कॉलिंगचा उपयोग करून वडीलांचे अंतिमदर्शन घेतले व अंत्यविधी पार पाडला.हा कोरोना अशी किती नाती निर्दयपणे तोडणार आहे कोणास ठाऊक ? कुठे गेली नाती?पाण्यावरल्या बुडबुड्यासारखी बघता बघता फुटून जाताहेत.मध्यप्रदेशातील शिवपुरी गावातील घटना.दिपक शर्मा या इंजिनीअरला कोरोनाची लागण झाली.त्यातून तो ठणठणीत बरा होवून घरी आला.पण आसपासच्या सगळ्या लोकांनी त्या घरावर बहिष्कार टाकलाय.दिपक म्हणतो मी जणू खून करून आलोय या नजरेने लोक माझ्याकडे पहातायेत.त्याचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी आहेत.त्या काॅलनीतील सगळ्या लोकांनी दूधवाला,भाजीवाला यांना सांगून ठेवलय.त्या घरात कोरोना आहे.तिकडे विक्री करायची असल्यास काॅलनीत यायचे नाही.सगळ्या विक्रेत्यांनी त्या घरावर बहिष्कार टाकलाय.समाजाचा असंवेदनाशील व अमानवी व्यवहार बघून आता शर्मा कुटुंबिय शिवपुरीतील घर विकून ग्वाल्हेरला रहायला जाणार आहे.कुठे गेला शेजारधर्म?कुठे गेली माणुसकी?कोरोनानाने या सगळ्या नात्यांना उलटेपालटे केलय.सुनिलने हिंदी सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेता आयुष्यान खुरानाच्या इन्साग्रामवरील कवितेच्या चार ओळी दाखवल्या.आयुष्यानने अगदी मोजक्या शब्दांत आजच्या विदारक परिस्थितीचे वर्णन केले आहे…..
आज हम डरे हुये है
जिवीत है पर मरे हुये है..
कोरोनाने सगळी नाती विस्कटून टाकली आहेत.कोरोनाचे विषाणू तोंडावरच्या मऊ त्वचेतून आत शिरतात म्हणून मास्क वापरा असे डाॅक्टर सांगताहेत.हा कोरोना तोंडावाटे नुस्ता आत शिरत नाही.मुखवट्याच दडलेल्या खोट्या नात्यांचा भीषण चेहराही दाखवतोय.पूर्वीची माणसं एक गोष्ट नेहमी सांगायचे…जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो तेंव्हा पाण्यात बुडणारी माकडीणसुध्दा आपल्या पिलाला पायाखाली घेवून जीव वाचवते.आज समाजातील असंवेदनशील उदाहरणे बघितली की एकच जाणवतय माणसे सुद्धा वेळ आली की नात्यांचा बळी देवून आपला जीव वाचवताहेत.शेवटी माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली आहे असे म्हणतात.असो हे ही दिवस जातील.आज तरी डाॅक्टर,नर्स,पोलिस,सफाई कामगार हेच लोक समाजाशी जिवंत नाते जोडून कर्तव्यपूर्वक सेवा देता हेत.कोरोनाने रक्ताच्या,शेजारच्या नात्यातील पोकळपणा दाखवला.तसाच या कर्तव्यपूर्वक सेवा देणार्यांच्या नात्यातील घट्ट ओलावाही दाखवला.मास्कमुळे एका बाजूला खोट्या नात्यांचा मुखवटा गळून पडत असतानाच खर्या सेवाभावी लोकांचा चेहराही समोर आला.या खर्याखुर्या नात्यांच्या आधारानेच कोरोनाला हरवायचे आहे.सोबतीला खांद्याला खांदा लावून लढणारे आपण शेतकरी आहोतच…
*शब्दांकन*
सदाभाऊ खोत
सदस्य,विधानपरिषद.

*कोरोनामुळे हरवलेल्या माणुसकीचे प्रत्यक्ष दर्शन*

कोरोना हा व्हायरस खरंच महाभयंकर आहे परंतु त्याही पेक्षा महाभयंकर असा रोग या कोरोनामुळे प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे तो म्हणजे सेल्फीश पणा त्यातून हरवलेल्या माणुसकीचे दर्शन प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे
सोशल डिस्टनशिंगच्या नावाने समाजापासून दूर राहणारे लोक अजूनच दूर राहायला शिकले आहेत , त्यांना सगेसोयरे असतील,नातेवाईक असतील शेजारी पाजारी असतील या सोशल डिस्टणशिंगचा पुरेपूर काटेकोर उपयोग करणारे काही निवडक लोक आज असे काही वागू शकतात तर भविष्यात खरंच एखादा वाईट प्रसंग आलाच तर कसे वागतील याचा अनुभव या कोरोनाच्या सोशल डिशटणशिंगने प्र्याक्टिकली अनुभवायला मिळत आहे
कोणी शेजारी उपाशी तापाशी आहे की कोणी आजारी आहे की काही अडचणीत आहे याचं या काटेकोर सोशल डिस्टणशिंगच पालन करणाऱ्या काही लोकांना इतरांचं काहीच देणं घेणं नाही असच चित्र अर्ध सुशिक्षित लोकांकडून अनुभवायला मिळत आहे.

प्रशांत ढोरे पाटील
7507759777