Home महत्वाची बातमी छायाचित्रकारांवर उपासमारीची पाळी सतत दुसऱ्यांना स्माईल, प्लिज करणारे चेहरे हिरमुसले…

छायाचित्रकारांवर उपासमारीची पाळी सतत दुसऱ्यांना स्माईल, प्लिज करणारे चेहरे हिरमुसले…

65
0

देऊळगावराजा (रवि आण्णा जाधव) कुठलेही शुभ कार्य असो, सांस्कृतिक, धार्मिक लग्न समारंभाचे कार्यक्रम असो अशा ठिकाणी छायाचित्रकाराला आवर्जून बोलविले जाते. छायाचित्रकार या ठिकाणचे प्रत्येक क्षण स्माईल, प्लिज म्हणत आनंदाने टिपत राहतो. मात्र देश-विदेशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका छायाचित्रकारानांही बसला असून यामुळे त्यांच्यावरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाउन असून मागील पंधरा ते वीस दिवसापासून हा लॉकडाउन सुरू असून यात परत वाढ करण्यात आली असल्याने लग्न समारंभाचे घेतलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. काही समारंभ पुढे ढकलण्यात आले आहे. बऱ्याच जणांनी ॲडव्हान्स देखील घेतला होता. परंतु या परिस्थितीतमुळे तो परत देण्याची वेळ आली आहे. देऊळगावराजा शहरात १५ ते २० स्टुडिओ असून अनेकजण आठवणी म्हणून स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढतात. विविध प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम देऊळगावराजा तालुक्यात नेहमी सुरू असतात. तालुक्यातील विविध खेड्यामधून लग्न समारंभाच्या ऑर्डरदेखील छायाचित्रकारांना मिळत असतात. त्यात मार्च, एप्रिल हे लग्न सराईचे दिवस असल्याने लॉकडाउनमुळे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने छायाचित्रकारांना कामा अभावी बसून राहावे लागत असल्याने त्यांचावर उपासमारीची वेळ आली आहे. हेच चित्र पूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

फायनान्सकडून घेतलेल्या कर्जहप्त्यांस तूर्तास स्थगिती मिळावी
मार्च एप्रिल हा काळ लग्न सराईचा काळ असतो. याच काळात जास्तीत जास्त लग्नाच्या ऑर्डर छायाचित्रकाराकडे बुकिंग असतात. याच ऑर्डरकरिता बहुतांश छायाचित्रकारांनी दीड ते दोन लाखापर्यत फोटो, विडिओ कॅमेरे खरेदी केलेले आहेत. मासिक हप्त्यावर विविध कंपन्याकडून कर्ज घेतले आहे. सध्या लॉकडाउनमुळे कार्यक्रम रद्द झाले असून नवीन ऑर्डर मिळने कठीण झाले आहे. त्यामुळे उत्पन्नाचे सगळे स्रोत बंद झाले असून हे मासिक हफ्ते फेडायचे कसे असा यक्षप्रश्न त्याचासमोर आहे. या कर्जहप्त्यांस स्थगिती मिळावी अशी मागणी फोटोग्राफर असोसीएशनकडून होत आहे.

लग्नसराई मेपर्यंत असून लॉकडाउनमुळे या काळात सर्वच कार्यक्रम रद्द होत असून पुढे ४ ते ५ महिने कुठलेच कार्यक्रम नसतात. त्यामुळे फोटोग्राफी व्यवसायवर देखील मोठं संकट उभे राहिले आहे. शासनाने आमच्या व्यथा समजून शासनदरबारी मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुरज गुप्ता
जेष्ठ छायाचित्रकार देऊळगावराजा

सध्या मोबाइलमुळे वाढदिवस व उत्सवाला फोटो काढणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हा व्यवसाय लग्नसराईवर अवलंबून आहे. परंतु कोरोनांमुळे सर्व बुकिंग रद्द झाल्याने उपासमारीची वेळ फोटोग्राफर बांधवावर आली आहे.

कैलास खांडेभराड
देऊळगावराजा फोटोग्राफर