मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मागणी….!
हरीश कामारकर
यवतमाळ / पुसद – विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांनी कोरोना या संसंर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे व अवकाळी पावसामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी केली.
पुसद विधानसभा मतदारसंघात टरबूज, संत्री,आंबा व भाजीपाल्याचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. यावेळी पीक जोरदार आले होते परंतु कोरोना च्या आजारामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाला हा शेतातच उभा राहिला. टरबूजाला व्यापारी विकत घ्यायला तयार नाही. कित्येक शेतकऱ्यांनी टरबूजाचे उभे पीक उपटून फेकले आहे. आंबा व संत्रा बाबत पण अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रती हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार इंद्रनील नाईक यांनी केली आहे.पुसदचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या मार्फत हे पत्र पाठविण्यात आले आहे.
