
पोलीस कर्मचाऱ्यांसमोर वाहने सुसाट , ???
बदनापूर, दि 24 (प्रतिनिधी): कोरोना पसरू नये म्हणून प्रशासन हरतर्ऱ्हेने प्रयत्नशील असून संपूर्ण राज्यात संचारबंदी व जिल्हा सिलबंद करण्याचे आदेश देण्यात आलेले असताना बदनापूर येथील वरूडी येथील चेकपोस्टवर वाहने तपासणी करण्याचे काम पोलिसांच्या वतीने सुरू असले तरी काही वाहेन पोलिसांना गुंगारा देऊन निघत असल्यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सूचना पाळण्याची आवश्यकता दिसून येत आहे.
जालना जिल्हयातील संपूर्ण संचारबंदी व जिल्हा बंदीचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिलेले आहेत. त्या अनुषंगाने येथील वरूडी येथील रुग्णालयाजवळ चेक पोस्ट तयार करण्यात आलेले असून या ठिकाणी औरंगाबाद जिल्हयातील वाहने येऊ नये म्हणून तपासणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बॅरिकेटस लावून पोलिसांद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येऊन त्यांना वापस पाठवण्यात येत असल्याचे दिसून आले असले तरी औरंगाबाद-जालना हमरस्त्यावर वाहतूक मात्र सुरूच दिसली. वरूडी येथे बॅरिकेटस लावलेले असल्यामुळे गेवराईमार्गे वाहने येऊन पुन्हा हमरस्त्याला लागत असल्याच्या शक्यतेवरून गेवराई बाजार परिसरातील ग्रामस्थ व तरुणांनी गेवराई फाटयावर थेट आडव्या दोऱ्या बांधून हा रस्ता दुपारनंतर बंद केलेला दिसून आला. या बाबत या तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, काही वाहने शेकटयाहून थेट गेवराई फाटामार्गे येत असल्यामुळे गेवराई बाजार परिसरातील नागरिकांना या कोरोना विषाणूची लागन होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून आम्ही गेवराई गावात येणारा हमरस्ताच बंद करण्याचा निर्णय् घेतला असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वरूडी फाटा येथे पोलिस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तपासणी करण्यात येऊन बाहेरील जिल्हयातील सर्व वाहने थांबवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी औरंगाबाद- जालना मुख्य रस्त्यावर मात्र वाहनांची वर्दळ दिसूनच येत असल्यामुळे नागरिकांमध्येही जागृकता नसल्याचे दिसून येत असून नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचना पाळण्याची आवश्यकता दिसून येत आहे.











































