Home महत्वाची बातमी रविवारी २२ मार्चला देशात सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत लागणार ‘जनता...

रविवारी २२ मार्चला देशात सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत लागणार ‘जनता कर्फ्यू’

344

२२ मार्चला देशभरात ‘जनता कर्फ्यु’ पाळा , “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे” नागरिकांना आवाहन

हा कर्फ्यु म्हणजे कोरोना विरुद्ध लढण्याच्या आपल्या आत्मसंयमाचे प्रतिक असेल.

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

नवी दिल्ली , दि. १९ :- कोरोना व्हायरसचा (COVID 19) सामना करण्यासाठी येत्या २२ मार्चला म्हणजेच रविवारी देशातील नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना केले. जनता कर्फ्यु लागू झाल्यानंतर नागरिकांनी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घरातून बाहेर पडू नये. हा कर्फ्यु म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लादून घेण्यात आलेला कर्फ्यु असेल. हा कर्फ्यु म्हणजे कोरोनाविरुद्ध लढण्याच्या आपल्या आत्मसंयमाचे प्रतिक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट हे एखादे राज्य किंवा देशापुरते मर्यादित नाही.पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्यावेळीही जगातील सर्व देशांना झळ पोहोचली नव्हती. मात्र, कोरोनाच्या रुपाने यावेळी संपूर्ण मानवजातीसमोरच संकट उभे ठाकले आहे.आतापर्यंत भारताने या संकटाचा निर्धाराने सामना केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात आपण कोरोनाच्या संकटापासून वाचलोय किंवा आपल्याकडे सर्वकाही ठीक आहे, असे वातावरण नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु, आपण कोरोनाच्याबाबतीत अशाप्रकारे निश्चिंत राहणे कदापि परवडण्यासारखे नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग आणि सावध राहिले पाहिजे.यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे अर्थात सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आणि प्रभावी मंत्र आहे. तसेच नागरिकांनी स्वत:सोबत इतरांनाही स्वस्थ ठेवण्याच संकल्प केला पाहिजे. या दोन गोष्टींच्या बळावर आपण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करू शकतो, असे मोदींनी सांगितले.

यावेळी मोदींनी कोरोना व्हायरसच्या स्वरुपाकडेही लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत ज्या देशांमध्ये कोरोनाचा जास्त प्रभाव दिसून आला आहे, त्याठिकाणी एक बाब प्रकर्षाने आढळून आली. ती म्हणजे सुरुवातीच्या दिवसांत याठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग सामान्य होता. मात्र, नंतरच्या टप्प्यात या देशांमध्ये अचानक विस्फोट झाल्याप्रमाणे प्रचंड वेगाने कोरोनाची लागण झाली. त्यामुळे भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्यादृष्टीने ही सामान्य बाब नाही. विकसित देशांमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे भारतात काहीच होणार नाही, अशा भ्रमात राहणे अत्यंत चुकीचे ठरेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.