Home पुणे यवतमाळच्या व्ही. पी. पाटील यांच्या स्वकथनाचे पुण्यात प्रकाशन संपन्न…!

यवतमाळच्या व्ही. पी. पाटील यांच्या स्वकथनाचे पुण्यात प्रकाशन संपन्न…!

42
यवतमाळ जिल्ह्याचे माजी शिक्षणाधिकारी, प्रथितयश साहित्यिक मा. विठ्ठल पांडुरंग पाटील यांच्या बहुचर्चित स्वकथनाचा ग्रंथ ‘मायनस शून्य’  नुकतेच बर्ड व्हॅली पिंपळे सौदागर पिंपरी पुणे येथे मोठ्या थाटात  प्रकाशन झाले. एकाच नजरेत हा ग्रंथ वैचारिकदृष्ट्या सर्वांना आवडला. याच प्रकाशन सोहळ्यात लेखकाच्या ‘शब्द शब्द बुद्ध’  या कविता संग्रहाचे सुद्धा पुनर्प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षा जेष्ठ साहित्यिक व समीक्षक मा. प्रज्ञा हंसराज बागुल या होत्या. तर प्रा. डॉ. संदीप सांगळे अध्यक्ष सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मराठी अभ्यास मंडळ  यांच्या शुभहस्ते या दोन्ही पुस्तकांचे  प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. यशवंत शितोळे सर करिअर कट्टा महाराष्ट्र राज्य,  मा. संतोष संखद सर,  दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त, ‘एक भाकर तीन चुली’ या कादंबरीचे लेखक तथा पेन पब्लिशिंग हाऊस पुणे या संस्थेचे सर्वेसर्वा प्रख्यात लेखक देवा झिंजाड सर यांनी या पुस्तकांबद्दल भाष्य केले.
यावेळी मायनस शून्य या स्वकथनाचे लेखक व जेष्ठ साहित्यिक विठ्ठल पांडुरंग पाटील तथा त्यांच्या पत्नी विजया पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मायनस शून्य हे पुस्तक साहित्य क्षेत्रातील माईल स्टोन असून या पुस्तकात लेखकाने १९६०-७० च्या दशकातील वास्तव चित्र उभे केले आहे, असे मत प्रा. डॉ. संदीप सांगळे सर यांनी व्यक्त केले. या पुस्तकाला पहिली समीक्षा लिहिणाऱ्या मा. प्रज्ञा बागुल यांनी हे पुस्तक विद्यापीठात पिएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासक्रमात लावावा इतक्या उच्च प्रतीचे लेखन आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून लेखकाने सतत लिहित राहून आंबेडकरवादी साहित्यात भर घालावी असे विचार आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले. देवा झिंजाड सर यांच्या पेन पब्लिशिंग हाऊस या नवीनच निर्माण झालेल्या प्रकाशन संस्थेचे हे पहिलेच पुस्तक असून या पुस्तकात लेखकाने त्यांचे व तत्कालीन समूहाचे जीवन एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे लिहिले आहे अशा भावना व्यक्त केल्यात. संतोष संखद यांनी सुद्धा या प्रसंगी आपले मत मांडले असून हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या आई – वडिलांचे जीवन माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना लेखकाने या पुस्तकाची कशी जडणघडण कशी झाली हे सांगताना या पुस्तकाच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय त्यांची पत्नी विजया पाटील तथा मुलगा नितीन मुलगी श्वेता व सुन रश्मी पाटील यांना दिले.
आतापर्यंत स्वकथन म्हणून गौरविण्यात आलेल्या अनेक स्वकथनात या पुस्तकाने भर घालून साहित्य क्षेत्राला सन्मानित केले अशा भावना उपस्थित रसिक श्रोत्यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुण्याचे उपायुक्त मा. अण्णा बोदडे सर यांनी सुद्धा उपस्थित राहून या पुस्तकाचे व लेखकाचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलाक्षी काळे सालके यांनी केले असून या पुस्तकाचा आशय घेऊन अपर्णा जगताप बेंगळे यांनी पत्रवाचन केले. रश्मी नितीन पाटील यांनी पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून दिला तर प्रा. डॉ. रंजना मेंढे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.
या पुस्तक प्रकाशन समारंभाला वीर संभाजी जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांनी सपत्नीक उपस्थित राहून लेखक व त्यांच्या पत्नी विजयाताई यांचा सत्कार केला. तसेच फिल फाऊंडेशन ग्रुप व लेखकांच्या अनेक मित्र मंडळींनी सुद्धा सत्कार केला. तसेच अनेक मान्यवरांनी हे पुस्तक आवर्जून खरेदी केले.