Home यवतमाळ शाश्वत शेतीसाठी सावरगड येथे ‘मृदा नमुना तपासणी’ प्रात्यक्षिक

शाश्वत शेतीसाठी सावरगड येथे ‘मृदा नमुना तपासणी’ प्रात्यक्षिक

139
यवतमाळ : शाश्वत शेती आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगत सावरगड येथे ‘मृदा नमुना तपासणी’ प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय, यवतमाळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रामीण व कृषी विकास कार्यानुभव’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वंश पखाले, साई वसाळे, अन्वित सोनवणे, चेतन काकडे, देवश्री काकडे आणि तनुश्री डहाके यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाची गरज, त्याचे फायदे आणि ‘मृदा स्वास्थ्य कार्ड’ योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात शेतात नेऊन मातीचे नमुने कसे घ्यावे, कोणत्या खोलीतून माती काढावी आणि नमुना घेण्याची योग्य प्रक्रिया कोणती, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले. तसेच, माती परीक्षण केंद्रामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी कशी केली जाते व त्यानुसार खतांचे नियोजन कसे करावे, याचेही मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू, कार्यक्रम अधिकारी एस. पी. लोखंडे, विषयतज्ज्ञ प्रा. टी. बी. भोयर व प्रा. एस. बी. ठोंबे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला सावरगडचे सरपंच अनिल भिसे व उपसरपंच शंकर भुजाडे यांनी आवर्जून उपस्थित राहून माती परीक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेतली. परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.