
अमिन शाह
बुलडाणा ,
साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांग्री काटे शिवारात दोन शेतकऱ्यांनी चक्क अफूची शेती पिकविली. हा प्रकार मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी पथकासह धाड घालून उघडकीस आणला. दोन्ही शेतकऱ्यांच्या ताब्यातून १ कोटी ३३ लाख रुपयांची अफूची झाडे आणि बोंडे हस्तगत करण्यात आली.
भागवत सदाशीव काटे व विशाल रमेश काटे अशी अफू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हे आपल्या पथकासह मेहकर, पांग्री काटे, साखरखेर्डा भागात सोमवारी रात्री गस्त घालत होते. पांग्री काटे शिवारात अफूची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती खाडे यांना मिळाली. त्यानुसार खाडे यांनी आपला मोर्चा पांग्री काटे गावाकडे वळविला. गट नं. १४८ आणि गट नं. १२८ मध्ये छापा मारला असता अफूचे पीक आढळून आले. सदाशीव काटे याच्याकडून पिकाची बोंडे, फुले पाने असलेली १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाची झाडे ( किंमत अंदाजे ८६,१२,८०० रुपये) तसेच विशाल रमेश काटेकडून बोंड, फुले पाने असलेली झाडे ५७ किलो ३२० ग्रॅम (किंमत ४५,८५,६०० रुपये) असा १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raid on opium plantation; Plants worth 1.25 crores seized along with bonds
पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ८ (क), १८ (क) NDPS Act प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांची धाडसी कामगिरी
डीवायएसपी संतोष खाडे यांच्या नेतृत्वात एपीआय गजानन करेवाड, पीएसआय गणेश कड, पोहेकॉ डिगांबर चव्हाण, पोहेकॉ सुनील देशमुख, पोहेकॉ उमेश घुगे, किशोर बोरे, आकाश काळदाते, सलीम गवळी यांच्यासह RCP पथक तसेच सिंदखेड राजा तहसीलची नायब तहसीलदार संदीप बंगाळे, ग्राम महसूल अधिकारी आनंद राजपूत, कृषी सहाय्यक कोल्हे, राज्य उत्पादन शुल्क चे दुय्यम निरीक्षक आनंदा शिंदे, फॉरेन्सिक मोबाइल पथक बुलढाणा, अंमली पदार्थ शोधक पथक, श्वान पथकाने या धाडसी कामगिरीत सहभाग घेतला ,















































