Home यवतमाळ ज्योती बारच्या गल्लीत खुलेआम मटका जुगार! दररोज लाखोंची उलाढाल; वणी पोलीस प्रशासनाची...

ज्योती बारच्या गल्लीत खुलेआम मटका जुगार! दररोज लाखोंची उलाढाल; वणी पोलीस प्रशासनाची धक्कादायक मुकसंमती

247

वणी – शहरातील ज्योती बारच्या गल्लीत सध्या खुलेआम “झंडी–मुंडी” मटका जुगार सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच वणीसाठी स्वतंत्र एलसीबी पथक असतानाही बिनधास्त सुरू आहे.

शहरातील ज्योती बारच्या गल्लीत खुलेआम सुरू असलेला झंडी–मुंडी मटका जुगार हा आता सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाही वणीसाठी स्वतंत्र एलसीबी (लोकल क्राईम ब्रँच) पथक असणे केवळ कागदापुरतेच आहे का? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.

ही गल्ली रहदारीसाठी वापरली जाते. याच मार्गाने दररोज शालेय विद्यार्थी, महिला व नागरिकांची ये-जा असते. मात्र याच ठिकाणी दारू पिऊन मटका लावणाऱ्यांची गर्दी, गोंधळ आणि धिंगाणा नित्याचाच झाला आहे. परिसरातच सुजाता थिएटर असल्याने संध्याकाळच्या वेळी गर्दी आणखी वाढते.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मटका अड्डा दिवसभर सुरू असतो. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “जर पोलीस कारवाई करत नसतील, तर या अवैध धंद्यांना अभय कुणाचे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या बेकायदेशीर जुगारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून लहान मुलांवर व विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. महिलांना या मार्गाने जाणेही अवघड झाले आहे.

शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच नाकाखाली असा प्रकार सुरू असणे ही गंभीर बाब आहे. आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ धडक कारवाई करावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही देण्यात येत आहे.
या गल्लीत सुरु असलेल्या मटका जुगार झंडी मुंडी चा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे