Home यवतमाळ मृद व जलसंधारण विभागातील कोट्यवधींच्या कामांवर संशय, “चौकशीची मागणी” – भीमराव राठोड

मृद व जलसंधारण विभागातील कोट्यवधींच्या कामांवर संशय, “चौकशीची मागणी” – भीमराव राठोड

856
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागामार्फत विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रे व पेन ड्राइव्हमधील माहितीची पडताळणी केल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मौजे मांगकिन्ही, कनिहार, हरू, पिंपळखुटा या गावासह दारव्हा दिग्रस आणि नेर परिसरातील कामांची माहिती तपासली असता अनेक नोंदी संशयास्पद आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित कामांसाठी देण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशांपासून ते आर्थिक नोंदीपर्यंत अनेक बाबींमध्ये तफावत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या संदर्भात सहदेव कन्स्ट्रक्शन, नागपूर यांना देण्यात आलेल्या कामांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, प्राप्त पेन ड्राइव्हमधील काही कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मातृभूमी भेदभाव निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भिमराव राठोड यांनी याबाबत यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शासकीय निधीचा अपव्यय झाला असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत योग्य त्या चौकशीचे आदेश देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.