
फुलचंद भगत
वाशिम:-अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुकीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाशिम तालुक्यात मोठी धडक कारवाई केली आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच अमरावती विभागाचे विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली.
दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशिम तालुक्यातील मोहगव्हाण शेतशिवारातील धरणाच्या काठी अवैध हातभट्टीविरोधात सामूहिक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.कारवाईदरम्यान अवैधरीत्या चालविल्या जाणाऱ्या हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुकीवर थेट आघात करण्यात आला.
या कारवाईत एकूण पाच गुन्हे नोंदविण्यात आले असून ३० लिटर गावठी दारू, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारा २ हजार ३७५ लिटर मोहासडवा (रसायन) तसेच हातभट्टीसाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ९५ हजार १५० रुपये इतकी आहे.
यापुढेही जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. सदर कारवाईत विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवानकर यांच्यासह प्रभारी निरीक्षक अनंतकुमार खांदवे, निरीक्षक एम. के. उईके, दुय्यम निरीक्षक राजरतन मनवर, एम. एस. जाधव, अश्विनी उबाळे, सुरेश चव्हाण तसेच अधिनस्त जवान व कर्मचारी सहभागी झाले होते.दरम्यान, अवैध दारू विक्री अथवा हातभट्टी निर्मितीबाबत नागरिकांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३, व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ तसेच ‘एक्साईज सुविधा पोर्टल’वर संपर्क साधता येणार असल्याचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.












































