
कळंब (ता. प्रतिनिधी):-विरेंद्र चव्हाण
कळंब :-पांढरकवडा आगारातून सायंकाळी 4.30 वाजता अकोला कडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’ बसचा भीषण अपघात आज दि. 30 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजताच्या दरम्यान घडला. शेळी (खटेश्वर ) दरम्यानच्या रस्त्यावर एका महिलेला बसने जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या.अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव सिंधुबाई भीमराव सखापुरे वय 45 वर्ष असे असून त्या खैरी, ता. कळंब, जि. यवतमाळ येथील रहिवासी होत्या. अपघातग्रस्त बसचा क्रमांक MH 14 MH 1485 असून ही बस पांढरकवडा डेपोची आहे.
संबंधित ठिकाणी रस्त्याच्या कडेला असताना अचानक बसची धडक बसल्याने महिला दूर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमांमुळे त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशन, यवतमाळचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आला आहे.












































