
उपमुख्य कार्यकारी अधी. कडे तक्रार
कळंब ता. प्रति:-विरेंद्र चव्हाण
कळंब : कळंब तालुक्यातील देवनळा येथे गर्भवती मातांना शिळे अन्न वाटप करण्यात आल्याचा प्रकार येथे शुक्रवारी घडला. या प्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.देवनळा येथे एका घरगुती कार्यक्रमातील शिळी भाजी, भात अंगणवाडी सेविकेने गर्भवती महिलांना दिला. त्यामुळे या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडीसेविका अनेकदा खराब झालेली अंडी, केळी आणि निकृष्ट दर्जाचे शिजवलेले चणे गरोदर माता आणि अंगणवाडीतील मुलांना खाऊ घालतात, असा आरोप करण्यात आला आहे.
देवनळा येथील दिनेश मांडवकर, विक्रम राठोड, पोलिस पाटील अजय किनाके, ग्रामपंचायत सदस्य भास्कर राठोड, नरेंद्र राठोड, नंदू राठोड, हितेश राठोड, नीलम राठोड आदींनी निवेदन दिले. संबंधित अंगणवाडी सेविकेवर सात दिवसाच्या कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.













































