Home यवतमाळ यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा: अभिनेते अमित राऊत यांना ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार’...

यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा: अभिनेते अमित राऊत यांना ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

338

यवतमाळ / प्रतिनिधी – यवतमाळच्या कलाक्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते अमित श्रीराम राऊत यांना सन २०२६ चा मानाचा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. स्वराज्य फिल्मचे राष्ट्रीय सचिव मा. श्री. सूरज सुधाकरराव पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, या घोषणेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
अमित राऊत यांचा कलाप्रवास यवतमाळच्या मातीतून सुरू झाला. स्थानिक स्व. रामाजी चन्नावार विद्यालय, सिंघानिया नगर येथील साहाय्यक शिक्षक आणि प्रसिद्ध नाट्यकर्मी अशोक नारायण आष्टीकर यांचे ते शिष्य आहेत. गेल्या २० वर्षांपासून ‘अस्मिता रंगायतन’ या नाट्य संस्थेच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची अविरत सेवा केली आहे. अनेक कठीण प्रसंगांवर मात करत त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला. विशेषतः ‘काजू’ या मराठी चित्रपटातील त्यांच्या मुख्य भूमिकेने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात घराघरांत पोहोचवले आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
त्यांच्या प्रदीर्घ कला प्रवासात त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी दोन रौप्य पदके पटकावली असून, त्यांना मानाचा ‘यवतमाळ रत्न’ पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांच्या या प्रवासाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असून, दादासाहेब फाळके पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे.
हा गौरव सोहळा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड, पुणे येथे अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार मा. श्री. अमोल कोल्हे यांच्या हस्ते अमित राऊत यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. अमित राऊत यांच्या या यशामुळे यवतमाळच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडली असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.