Home नागपूर दागिने विकून करणार होते मौजमजा- घरफोडीसह दुचाकी चोरी उघडकीस

दागिने विकून करणार होते मौजमजा- घरफोडीसह दुचाकी चोरी उघडकीस

232

आशिष अटलोए – जिल्हा प्रतिनिधी

नागपूर, – चांदीचे दागिने विकायचे आणि आलेल्या पैशातून मौजमजा मारायची असा बेत रचून बाजारात जाणाऱ्या आरोपींना प्रतापनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. परिणामी स्वावलंबी नगरातील घरफोडी आणि एक दुचाकी चोरीची घटना उघड झाली अन् दोन कुख्यात गुन्हेगार जाळ्यात अडकले. ही महत्त्वपूर्ण कामगिरी प्रतापनगर पोलिसांनी ठाणेदार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. राहुल बाबाराव लोंढे व दीपक महेश बागडे अशी अटक केलेल्या कुख्यात आरोपींचे नाव

आहे. हे दोघेही घरफोडी करण्यात पटाईत आहेत. या दोघांनी स्वावलंबी नगरातील पायोनीअर सोसायटीत एका बंद घरात घरफोडी केली. तेथील चांदीचे दागिने चोरून त्यांनी ते एका पिशवीत भरले.

याच दागिन्यांना विकून त्यांना मौजमजा मारायची होती. याकरिता ते जयताळा बाजारात एमएच ४९ बीसी ००४१ क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. याची गुप्त माहिती खबरीलालने वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांना दिली. त्यांनी तातडीने आपल्या पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार प्रतापनगर पोलिसांनी सापळा रचून जयताळा बाजारात जाणाऱ्या दोन्ही आरोपींना

जाळ्यात अडकवले. जेव्हा आरोपींजवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात २८ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने आढळले. तर दुचाकी वाहन त्यांनी दुबे ले-आऊट जयताळा बाजार चौकात असलेल्या एका अपार्टमेंट येथून चोरल्याचे कबुल केले. यामुळे एका चोरीसाठी पोलिस त्यांच्या मागावर होते. पण दोन गुन्हे प्रतापनगर पोलिसांनी उघड केले. पोलिसांनी याप्रकरणी चांदीचे दागिने आणि दुचाकी वाहन असा सुमारे एक लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश संपादन केले आहे. दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे करीत आहेत.