Home नागपूर अट्टल दुचाकी चोर जाळ्यात ,प्रतापनगर पोलिसांची कारवाई

अट्टल दुचाकी चोर जाळ्यात ,प्रतापनगर पोलिसांची कारवाई

236

जिल्हा प्रतिनिधी -डा.आशिष अटलोए

नागपूर – व्यवस्थित कुलूपबंद करून ठेवलेली दुचाकी अचानक चोराने चोरून नेली. याविषयी तक्रार प्राप्त होताच प्रतापनगर पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तीन दुचाकींसह आरोपीला गजाआड केले. एक वाहन चोरीला गेले होते, पण पोलिसांच्या प्रयत्नाने तीन गुन्हे उघडकीस आले, हे विशेष.

स्पंदन राहुल गणवीर असे अटक केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २७ जून रोजी रात्री फिर्यादी कुणाल सुभाष उमाठे यांनी त्यांच्या मालकीची एमएच ३१ एफएम ७२६४ क्रमांकाची दुचाकी प्लॉट नं. ५ करीम ले-आऊट गोपालनगर भागात व्यवस्थित कुलूप बंद करून ठेवली होती. रात्रीला

ठेवलेली दुचाकी जेव्हा घेण्यासाठी कुणाल उमाठे गेले तेव्हा त्यांना ती दिसलीच नाही. आसपास त्यांनी आपल्या वाहनाचा शोध घेतला. पण ती न आढळल्याने अखेर हतबल होऊन प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठले. तिथे ठाणेदार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी त्यांची तक्रार समजून घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करीत चोरी गेलेल्या वाहनाचा शोध सुरू केला. याकरिता ठाणेदार पंकज बोंडसे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल तांबे, हवालदार दिनेश भोगे, एकनाथ पाटील, अलेक्झांडर डिक्रुज, आनंद काबलिया, सचिन तिवारी यांनी चोरी गेलेल्या वाहनाचा युद्धपातळीवर तपास केला. तेव्हा त्यांना आरोपी स्पंदन राहुल गणवीर यानेच काही वाहने चोरल्याची माहिती मिळाली. आरोपीचे नाव समोर येताच प्रतापनगर पोलिसांनी तत्काळ स्पंदन गणवीर

याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला बाजीराव दाखविला अन् वाहनांबाबत माहिती घेतली. तेव्हा त्याने एक नव्हे तर तीन दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. एक वाहन शोधण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रतापनगर पोलिसांना तीन वाहने मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी स्पंदन गणवीर याच्या ताब्यातून एमएच ३१ एफएम ७२६४, एमएच ३१ बीपी ७०५४, एमएच ४० एव्ही ९७०४ क्रमांकाची वाहने जप्त केली. सुमारे ७० हजाराची वाहने जप्त करण्यात प्रतापनगर पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलिस उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी, सहायक पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी केली.