Home यवतमाळ विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात ‘भक्ती आणि रुग्णसेवे’चा संगम

विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात ‘भक्ती आणि रुग्णसेवे’चा संगम

352

श्री विनायकरावबापु देशमुख नर्सिंग कॉलेजमध्ये
विद्यार्थ्यांनी घडविले एकात्मतेचे दर्शन

यवतमाळ – येथील श्री विनायकरावबापू देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग येथे नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ‘रुग्णसेवा म्हणजेच ईश्वरभक्ती’ ही संकल्पना घेऊन साजऱ्या करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांना भक्ती, सेवा आणि समर्पणाचे संदेश दिला गेला.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीणभाऊ देशमुख, माजी सभापती अरुण राऊत, गंडे सर, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सिद्धू सर आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राध्यापक सोनल देशमुख यांच्या संकल्पनेतून नर्सिंग म्हणजेच ईश्वरभक्ती ही थीम घेऊन भक्ती आणि शक्तीतील एकात्मतेचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

पंढरपूरला विठ्ठल, आणि दवाखान्यांमध्ये परिचारिका दोघेही हिंमत हरलेल्याना आधार देणारे आहेत. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांची ओळख रुग्णसेवा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी. त्यातून नवोदित विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण करण्यासाठी आणि नर्सिंग क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, असे प्रास्ताविकातून प्राध्यापक सोनल देशमुख यांनी सांगितले. वारकऱ्यांच्या भक्तिमार्गाशी नर्सिंग सेवा जोडून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातील पावित्र्य आणि महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात गंडे सर यांच्या प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रवीणभाऊ देशमुख यांनी नर्सिंग हे केवळ एक व्यावसायिक शिक्षण नसून, तो एक सेवाभावाने भरलेला भक्तिमार्ग आहे, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी सेवा, करुणा आणि निस्वार्थपणे काम करत असताना त्यांच्या हृदयात ईश्वरभक्ती जागवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला नर्सेसचा सत्कार करण्यात यावेळी आला.
शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य अनिता राठोड , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेट्रन माया मोरे परिचारिका वंदना येडसकर यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना दिलासा आणि आरोग्य लाभले आहे. त्यांच्या जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांनी नक्कीच प्रेरणा घ्यावी, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडवत ‘आम्ही फक्त अभ्यास करत नाही, आम्ही सेवा शिकतो,’ या उद्घोषातून विद्यार्थ्यांनी नव्या वाटचालीस प्रारंभ केला.