Home महत्वाची बातमी नवरदेवाने नवरीच्या मांडीवर डोकं ठेवून घेतला अखेरचा श्वास ,

नवरदेवाने नवरीच्या मांडीवर डोकं ठेवून घेतला अखेरचा श्वास ,

748

 

अमीन शाह

सात जन्मांची साथ देण्याची शपथ घेत गडचिरोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून आपले प्राण सोडले. ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगोटा येथे ३ मे रोजी सकाळी घडली.
पत्नीसोबतचा पहिलाच प्रवास नारायणसाठी अखेरचा ठरला
पत्नीसोबतचा पहिलाच प्रवास नारायणसाठी अखेरचा ठरला
या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, गडचिरोली तालुका कोरची गाव गहाणगेटा येथील नारायण कंवलसिंह बोगा या २६ वर्षीय तरुणाचे ३० एप्रिल रोजी छत्तीसगडमधील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरूराम कुमेटी यांच्या दीपिका या मुलीशी लग्न झाले होते. लग्नानंतर नारायण आणि दीपिका सुखी संसाराची स्वप्ने बघत होते. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ मे रोजी नारायणने गावी स्वागत समारंभाचंही आयोजन केलं होतं.
स्वागत समारंभ पार पडल्यानंतर पोटात दुखत असल्याने नारायण हा बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परत आला. त्यानंतर २ मे रोजी त्याची प्रकृती बरी होती. परंतु, ३ मे रोजी पुन्हा नारायणच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे आपल्या एका मित्रासह नववधू दीपिकाला घेऊन तो दुचाकीवरून दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु रस्त्यातच त्याची प्रकृती अधिक बिघडली.
दरम्यान, पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने मोटारसायकल थांबवून नारायण याने नववधूच्या मांडीवर डोके ठेवले आणि काही क्षणांतच त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे लग्नानंतर पत्नीसोबतचा पहिलाच प्रवास नारायणसाठी अखेरचा ठरला. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.