Home महत्वाची बातमी गाईने मालकाला लाथ मारली मालकाचा राग अनावर झाला अन , विपरितच घडलं...

गाईने मालकाला लाथ मारली मालकाचा राग अनावर झाला अन , विपरितच घडलं ,

868

 

अमीन शाह

जालना- गाईचे दूध काढताना गाईने दूध काढणाऱ्याला लाथ मारल्याचा राग मनात धरून गाईच्या मालकाने गाईलाच ठार मारल्याची घटना रात्री जालना तालुक्यातील जामवाडी येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

अनेक वेळा दूध काढत असताना जनावरे लाथा मारतात विशेष करून पहिल्या वेळेस वासरू झालेल्या दुभत्या जनावरांमध्ये हा प्रकार जास्त घडतो त्यामुळे अनेक वेळा त्यांचे पाय बांधून देखील दूध काढले जाते. जामवाडी येथील हर्ष भगवान बनकर हे मंगळवार दिनांक एक रोजी गाईचे दूध काढत असताना गाईने त्यांना लाथ मारली लाथ मारल्याचा राग मनात धरून त्यांनी जवळच असलेले फावडे घेऊन गायीच्या माथ्यावर मारले यामध्ये गाय जागीच ठार झाली. या प्रकरणाची माहिती गावातीलच काही तरुणांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिली आणि त्यानंतर पाच-सहा कार्यकर्त्यांनी जाऊन घडलेल्या घटनेची खात्री केली त्यावेळी हर्ष भगवान बनकर यांनी गायीला फावडे मारल्याची कबुली दिली आणि त्यातच ती गतप्राण झाली. याप्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हर्ष बनकर यांच्या विरोधात न्याय संहिता कलम 325 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

न्याय संहिता कलम 325 म्हणजे काय?

भारतीय न्याय संहिता कलम 325 नुसार कोणत्याही जनावरांना मारणे, त्यांना विष पाजणे, अपंग करणे, बेकार करणे, यासाठी पाच वर्ष कैद आणि दंडाची शिक्षा आहे. दोन्हीही शिक्षा एकत्र होऊ शकतात. भारत सरकारने जनावरांच्या सुरक्षेसाठी हा कायदा तयार केला आहे.