
खासदार भावनाताई गवळी यांनी लोकसभेत उचलला प्रश्न
प्रतिनिधी यवतमाळ
केन्द्र व राज्य सरकारच्या 302 कोटीच्या अमृत योजनेचा यवतमाळात फज्जा उडाला आहे. आजही नागरीकांना सात ते आठ दिवस आड पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरीकांमध्ये संताप आहे. दरम्यान या योजनेत झालेल्या गैरप्रकारावरुन आज खासदार भावनाताई गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. सदर योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली.
जीवन प्राधीकरणने युध्दपातळीवर काम करुन अमृत योजनेचे काम पुर्ण करुन घ्यावे याकरीता लोकप्रतिनिधींनी वारंवार सुचना दिल्या. याकरीता नागरीकांनी अनेकदा आंदोलन केले, मात्र अमृत योजना पुर्ण झाली नाही. हा सर्व संतापजनक प्रकार बघून यापुर्वीच खासदार भावनाताई गवळी यांनी संबंधीत कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याची मागणी केली होती. या प्रकरणात कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याचे आदेश निघाले होते मात्र आदेश थंड बस्त्यात पडला. सन 2019 मध्ये पुर्ण करायची अमृत योजना अजुनही पुर्ण झालेली नाही. त्यामुळे नागरीकांच्या मनातील संताप आज खासदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून लोकसभेत व्यक्त झाला. केन्द्र तसेच राज्य सरकारने कोटयवधी रुपये दिल्यानंतरही ही योजना अपुर्ण आहे. या योजनेत 50 टकके निधी केन्द्र सरकारचा असल्यामुळे समिती पाठवून चौकशी करण्याची मागणी आज लोकसभेत करण्यात आली. मागील वर्षीचा उन्हाळा सुध्दा नागरीकांचा पाण्यासाठी भटकंती करण्यात गेला. आठ दिवस आड पाण्याचा पुरवठा सुरु असल्याने नागरीक संतप्त आहे. अनेक भागात तर बारा ते पंधरा दिवस आड पध्दतीने पाणी पुरवठा सुरु आहे. अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट दिसून येत असतांनाही कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. कंत्राटदार तसेच अधिका-यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे आतातर जनतेचा जीव धोक्यात आला आहे. निकृष्ट कामामुळे पाच वेळा पाईपलाईन फुटली. अठठावीस किलोमिटर पाईप लाईन बदलवावी लागली. भविष्यात सुध्दा पाईप फुटून यवतमाळकरांना धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे सखोल चौकशी करुन कंत्राटदार तसेच संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी भावनाताई गवळी लोकसभेत केली. या प्रश्नावर उत्तर देतांना आम्ही राज्य सरकारकडून माहिती घेणार तसेच कारवाई करणार असल्याचे केन्द्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगीतले.
कारवाईसाठी पाठपुरावा करणार
कंत्राटदाराच्या दुर्लक्षीतपणामुळे आज तीन वर्ष झाल्यानंतरही अमृत योजनेचे काम अर्धवट पडलेले आहे. यवतमाळ नगर परीषदेत परीसरातील आठ ग्रामपंचायत समाविष्ट करण्यात आल्यामुळे लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अमृत योजनेचे पर्याप्त पाणी मिळणे गरजेचे आहे. कंत्राटदार मात्र काहीच करायला तयार नसल्यामुळे नागरीकांच्या मागणीनुसार मी आज लोकसभेत कंत्राटदाराविरुध्द कारवाईची मागणी केली आहे.












































