Home यवतमाळ वाघाडीतील विसर्जन कुंडात ९०० हुन अधिक गणपती बाप्पांच विसर्जन

वाघाडीतील विसर्जन कुंडात ९०० हुन अधिक गणपती बाप्पांच विसर्जन

193

नदीतील विसर्जन रोखुन प्रदुषणमुक्ती, पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांचा प्रतिसाद

यवतमाळ (प्रतिनिधी) ता. वाघाडी येथे पहिल्यांदाच गणेशोत्सवात दोन विसर्जन कुंडांसह निर्माल्यकुंड, कचराकुंड तसेच प्लास्टिक टाकण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. याचा परिणाम गणेशोत्सवात किमान ९०० पेक्षा अधिक श्रीगणेश मुर्त्यांचे विसर्जन रितसर कुंडांमध्ये झाले. यामुळे वाघाडी नदीसह लगतच्या विहीरी, परिसर, देवस्थान क्षेत्रात होणारे प्रदुषण आणि साचणाऱ्या कचऱ्यावर रोकथाम करता येणे शक्य झाले. स्वच्छ सुंदर वाघाडी अभियानांतर्गत गतवर्षी गणेशोत्सवात दोन ते अडीच हजार मुर्ती वाघाडी नदीच्या पात्रातुन अगदी भग्न झालेल्या अवस्थेत काढण्यात आल्या होत्या. यंदा ही विटंबना थांबल्याचे समाधान गणेशभक्त, पर्यावरणप्रेमींसह कार्यरत संस्था, संघटनांनी व्यक्त केला.
वाघाडी येथे वर्षभरापासुन सामाजिक संस्था, संघटना आणि पर्यावरण स्नेहींमार्फत स्वच्छ सुंदर वाघाडी अभियान राबवीले जात आहे. यवतमाळचा एतिहासीक वारसा असलेल्या वाघाडी नदीचे संरक्षण व संवर्धनार्थ नानाविध उपक्रम येथे नियमीत होत असुन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक होण्याकरिता येथे श्री पर्यावरणपुरक विसर्जन व्यवस्था पार्वती ग्रुपचे श्री राजुभाऊ निवल आणि श्री अजुभाऊ मुंधडा यांचे माध्यमातुन उभारण्यात आली होती. नदी आणि परिसर प्रदुषित होऊ नये तसेच नदीसाक्षरतेसह जलजागृतीद्वारे जनजागृती होण्यासाठी ही लोकचळवळ ६० आठवड्यांपासुन यवतमाळकरांकडुन स्वयंस्फुर्तपणे सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातुनच अनंत चतुर्दशीला ७०० पेक्षा जास्त तर गणेशोत्सव सुरु झाल्यापासुन २०० पेक्षा अधिक मुर्त्यांचे रितसर कुंडातच विसर्जन करण्यात आले. अगदी सोमवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवसापर्यत ९०० पेक्षा अधिक श्रीगणेश मुर्त्यांचे कुंडांमध्येच विसर्जन करण्यात आले. यामध्ये नगर परिषदेतर्फे एका कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवाकार्याकरिता स्वच्छ सुंदर वाघाडी अभियानात सहभागी विविध संस्थांचे सर्वश्री रामचंद्र ढोबळे, सीताकाकु ढोबळे, गृहरक्षक दलाचे समादेशक अधिकारी निरंजन मलकापुरे, अश्विन सवालाखे, भुषण ढोबळे, सुभाष सगणे, अभय जोशी, अभीजीत खत्री, मिनाक्षी खत्री, अभीजीत गुल्हाने, सौरभ नाहर, ईसुभाऊ माळवे, अविनाश बोबडे, शिवकुमार सोलनकर, विवेक ढेरे, संतोष भोयर, अनिल ढेंगे, मानकर महाराज, आशिष कांबळे आदींनी सहकार्य केले.
*विहीरींचेही १०० टक्के संरक्षण*
श्रीगणेश भक्तांनी तसेच पर्यावरण स्नेहींनी श्रींच्या पर्यावरणपुरक विसर्जनाची साद आणि व्यवस्थेला स्वयंस्फुर्त प्रतिसाद दिला. वाघाडी नदी क्षेत्रातच दोन मोठ्या विहिरी आहेत. विहीरीला मोठ्या प्रमाणात पाणी असुनही श्रीगणेश विसर्जन काळात एकाही भक्ताचे श्रींच्या मुर्तीचे या विहिरीत विसर्जन न करता विसर्जन कुंडाचा वापर केला. यामुळे दरवर्षी होणारे विहिरीचे प्रदुषण १०० टक्के टाळता आले.
*पीओपीच्या मुर्तींचे नैसर्गिक विघटन*
प्लास्टर आँफ पॅरिसच्या (पीओपी) मुर्त्यांचे नैसर्गिकरित्या विघटन होण्यासाठी सोडियम बाय काब्रोनेट प्रमाणच्या द्रावण नागपूर येथुन बोलावीण्यात आले आहे. या द्रावणात या मुर्त्यांचे विघटन होण्यासाठी किमान ४८ तास लागतात. यामुळे जलस्त्रोत, माती आणि आरोग्याचे हानी विविध प्रदुषणांपासुन रोखता येणार असुन रविवारी ८ आँक्टोबरला ही प्रक्रिया वाघाडी येथे करण्यात येणार आहे.
*निर्माल्यापासुन खतनिर्मीती व सीडबाँल्स*
वाघाडी येथे निर्माल्यापासुन खतनिर्मीती करण्याचे एकुण ३ कुंड करण्यात आले आहेत. एका कुंडामध्ये जैविक खतनिर्मीती तयार होण्याकरिता एस ९ कल्चर टाकण्यात आले आहे. अन्य कुंडातील प्रक्रिया रविवारी ८ आँक्टोबरला होणार आहे. तयार झालेल्या खतांची मात्रा वाघाडी येथे रोपण करण्यात आलेल्या वृक्षांना देण्यात येणार आहे. यावेळी तयार केलेल्या सीडबाँलचीही वाघाडी नदीक्षेत्रात रोवण करण्यात येणार आहे.
*स्वच्छता ही सेवा मोहीम*
केंद्र तथा राज्य सरकारने स्वच्छता पंधरवाड्यात आवाहन केल्याप्रमाणे महात्मा गांधी जयंतीच्या निमीत्ताने वाघाडी येथे विविध संस्था, संघटनांच्या सदस्यांनी स्वयंस्फुर्त श्रमदान केले. यादरम्यान विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड, कचरा कुंडासह वाघाडी नदीक्षेत्रात स्वच्छता करण्यात आली. निर्माल्य व कचरा त्या त्या कुंडांमध्ये जमा करुन परिसर प्लास्टीकमुक्त करण्यात आला.