Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलाव व कोपरी (कापसी) येथील कोल्हापूरी बंधा-याचे काम...

घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलाव व कोपरी (कापसी) येथील कोल्हापूरी बंधा-याचे काम बंद..!

220

➡️ कोपरी (कापसी) येथील कोल्हापूरी बंधा-याला अद्यापही शासनाकडून प्रशासकीय मान्यता नाही.!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 10 सप्टेंबर :- घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलाव आणि कोपरी (कापसी) कोल्हापूरी बंधा-याला शासनाकडून अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने कोपरी (कापसी) येथील कोल्हापूरी बंधा-याचे काम दोन वर्षांपासून पुर्णतः बंद पडले आहे.

घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलावाचे काम सुद्धा जुन 2023 पासुन बंद पडले आहे. घाटंजी येथील मृद व जलसंधारण उपविभागात आर्णी, घाटंजी, केळापूर व कळंब तालुक्याचा समावेश असुन मृद व जलसंधारण उपविभागाच्या इतर तालुक्यात संबंधित उप अभियंताचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलावाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप सायतखर्डा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.

सायतखर्डा साठवण तलाव या प्रकल्पाला महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने शासन निर्णयानुसार, शासन निर्णय ज. अ. प्र. – 1005/सुकाणू/प्र. क्र. 10/ जल – 1 दि. 13 जानेवारी 2009 अन्वये 6 कोटी 86 लाख 43 हजार 400 रुपये इतक्या किंमतीचे प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पाला C – बांधकामे व D – मुख्य विमोजकच्या रुपये 5 कोटी 69 लाख 99 हजार 1600 रुपये इतक्या किंमतीचे अंदाज पत्रकात तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. या कामाच्या ब – 1 निविदा काढुन कामाचे आदेश विभागीय कार्यालयाचे पत्र क्रमांक 3571 दि. 30 डिसेंबर 2014 अन्वये मे. बाजोरिया कंटक्र्शन कंपनी प्रा. ली. यवतमाळ यांना प्रदान करण्यात आली. तसेच ब – 1 करारनामा क्रमांक/15/2014-15 अन्वये दि. 1 जानेवारी 2015 रोजी घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा साठवण तलावाचे काम सुरू करण्यात आले. सन 2015 मध्ये स्ट्रीपिंग, जलरोधी खंदकाचे (COT) खोदकाम, DRAINING चे खोदकाम, गाभा भराव (HEARTING) व आवरण भराव (CASTING) इत्यादी कामें करण्यात आली.

त्यानंतर भुसंपादनाच्या रक्कमेचे शोधन न झाल्यामुळे तसेच धरणाची उंची 15.00 मिटर पेक्षा जास्त असल्यामुळे काटछेद मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक यांचे कडुन संकल्पित करुन घेणे करिता काम बंद पडले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये जलरोधी खंदकाचे (COT) भरावाचे काम करण्यात आले.

विशेष म्हणजे सायतखर्डा साठवण तलावाच्या धरणाची उंची 23.00 मिटर पेक्षा जास्त असल्याने धरणाचा काटछेद संकल्पनास मोक्यावरिल उपलब्ध साहित्याचा वापर करून करावयाच्या बांधकामास मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (CDO) नाशिक यांचे कडुन मंजुरी आवश्यक असल्याने सायतखर्डा साठवण तलावाचे काम कंत्राटदाराद्वारे बंद करण्यात आले आहे.

➡️ दरम्यान, घाटंजी येथील मृद व जलसंधारण उपविभागाचे उप अभियंता राहुल मानकर यांचेशी संपर्क केला असता, सायतखर्डा साठवण तलावाचे काम पावसाळ्यामुळे सद्यातरी बंद असुन, कोपरी (कापसी) येथील कोल्हापूरी बंधा-याला अद्यापही शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने कोपरी (कापसी) येथील कोल्हापूरी बंधा-याचे काम पुर्णतः बंद आहे, असे त्यांनी सांगितले.
▶️ सायतखर्डा साठवण तलावाच्या कामावरील तसेच मृद व जलसंधारण उपविभागाचे कनिष्ठ अभियंता शाम बुटले यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी सायतखर्डा साठवण तलावाबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच माहिती देण्यास स्पष्ट नकार देऊन मला मृद व जलसंधारण उपविभागाचे उप अभियंता राहुल मानकर यांचेशी विचारुनच सायतखर्डा साठवण तलावाबाबतची माहिती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.