
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील खापरी येथील जिजाऊ प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापकासह ईतरांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन तपास करण्याचे आदेश घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्याय न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी घाटंजी पोलीसांना दिले होते. दरम्यान, अखेर रविवारी तिन्ही आरोपी विरुद्ध भादंवि कलम ४१७, ४२०, ४६८, ४७०, ४७१ व सह कलम ३४ अंतर्गत घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणात फिर्यादी अक्षय हरिदास विरदंडे यांचे कडुन ॲड. गणेश धात्रक यांनी न्यायालयात बाजू मांडली.
घाटंजी तालुक्यातील खापरी गावातील विद्यार्थ्यांचे नांव खापरी येथील जिजाऊ प्राथमिक आश्रम शाळा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा या दोन्ही शाळेत एकाच वेळी दर्शवुन हजेरी पटानुसार एकच विद्यार्थी दोन्ही शाळेत नमुद करुन शासकीय अनुदान लाटुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी जिजाऊ प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक एस. आर. सरमुकदम, प्रभारी मुख्याध्यापक घोगले व सहाय्यक शिक्षिका कु. एस. जी. चौधरी विरुद्ध भादंवि कलम ४१७, ४२०, ४६७, ४६८, ४७० व सह कलम ३४ अंतर्गत गुन्हे नोंदविण्याचे आदेश घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी घाटंजी पोलीसांना दिले होते. विशेष म्हणजे तक्रारदार अक्षय विरदंडे यांनी सदर प्रकरणात अगोदर घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. मात्र, घाटंजी पोलीसांनी दखलपात्र गुन्हा असतांना सुद्धा एफ.आय.आर. नोंदवला नाही. तदनंतर उप विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे कडे तक्रार नोंदवली. सदर प्रकरणात नियमानुसार गुन्हे दाखल न झाल्याने अखेर फिर्यादी अक्षय विरदंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलमानुसार घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात खटला दाखल केला. सदर प्रकरणात ॲड. गणेश धात्रक यांनी युक्तिवाद केला होता.
घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशीकांत नागरगोजे यांचेशी संपर्क केला असता, आरोपी विरुद्ध रविवारी एफ आय आर दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.
सदर प्रकरणात घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनिष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशीकांत नागरगोजे हे पुढील तपास करित आहे.











































