Home यवतमाळ तिसऱ्या दिवशी दोघांची प्रकृती खालावली चालक पदासाठी उपोषण; विभाग नियंत्रकाची डोळेझाक

तिसऱ्या दिवशी दोघांची प्रकृती खालावली चालक पदासाठी उपोषण; विभाग नियंत्रकाची डोळेझाक

223

 

यवतमाळ : एसटी महामंडळात चालक पदी नियुक्ती मिळत नसल्याने पांढरकवडा येथील वंचित आदिवासी अर्जदार उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवसाच्या मध्यरात्री यातील दोघांची प्रकृती खालावल्याने गुरुदेव युवा संघाच्या अध्यक्षांनी त्यांना रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात नेले परंतु त्यांनी भरती होण्यास नकार दिल्याने तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.


पांढरकवडा आगारात राबविल्या गेलेल्या चालक-वाहक पदासाठी येथील १८० आदिवासी अर्जदार पात्र ठरले होते परंतु त्यांना २०१९ पासून ते आजपर्यंत एसटी महामंडळाने सेवेत सामावून घेतले नाही. त्यांनी आजपर्यंत अनेक मार्गाने राज्य परिवहन मंडळाकडे आपल्या नियुक्तीसाठी लढा दिला परंतु, त्यांना अद्याप यश आले नाही. त्यांच्या पाठीशी सुरुवातीपासून असलेल्या गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी याहीवेळी त्यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा देत स्वतः ही उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री यातील मंगल चव्हाण व हुसेन अंजीकर या दोघांची प्रकृती अचानक खालावली. गुरुदेव युवा संघाच्या अध्यक्षांनी त्यांना रात्रीच जिल्हा रुग्णालयात नेले परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती पाहता त्यांचा रक्तदाब वाढला असून छातीमध्ये दुखणे वाढले असल्याची माहिती आहे.
हिवाळाच्या कडाक्यात वंचित चालकांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने विभाग नियंत्रकांविरोधात संतप्त वातावरण आहे. यांना आजपर्यंत रुजू का करण्यात आले नाही, याचा साधा खुलासाही त्यांनी केला नसल्याने गुरुदेव युवा संघाचे गेडाम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बॉक्स
आधी नियुक्ती त्यानंतरच उपचार
हुसेन अंजीकर व मंगल चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयातील सीएमओंनी त्यांना तत्काळ उपचाराला सहकार्य करून दाखल होण्याचा सल्ला दिला परंतु, त्या दोघांनी त्यास नकार दिला आधी नियुक्ती त्यानंतरच उपचार अशी भूमिका त्यांनी घेतल्याने डॉक्टरसुद्धा चक्रावून गेले होते.

बॉक्स
राजकारण्यांनो काही तर वाटू द्या
समाजाचे पाईक म्हणून मिरविणारे राजकारणी जिल्ह्यात सक्रिय नाही त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न दिसत नाही. गेल्या चार वर्षांपासून चालक पदासाठी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या १८० चालकांविषयी एकाही नेत्याने आपुलकी दाखविली नाही. आमदार, खासदार ते पालकमंत्र्यांनाही यांचा प्रश्न गंभीर वाटत नाही,त्यामुळे राजकारण्यांनो काही तरी वाटू द्या, असा टोला गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी लगावला आहे.

बॉक्स
विभाग नियंत्रकांनी सोडले थंडीत
विभाग नियंत्रकांनी अद्याप या उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही. थंडीच्या हुडहुडीमध्ये त्यांचे उपोषण सुरु आहे. गेल्या चार वर्षांपासून नियुक्तीसाठी लढणाऱ्या या आदिवासी चालकांना विभाग नियंत्रकांनी थंडीत वाऱ्यावर सोडले, अशी टीका गेडाम यांनी केली आहे.