Home यवतमाळ पारवा येथील माहिती अधिकार कार्यकर्ताच्या खुन प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व...

पारवा येथील माहिती अधिकार कार्यकर्ताच्या खुन प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला..!

211

 

( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी : तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या पारवा येथील रोजगार हमी योजना वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत घोटाळ्यातील कागदपत्रे मृतक अनील ओचावार यांच्या हाती लागल्याने पारवा वन परिक्षेत्र कार्यालयातील रोहयो घोटाळा उघडकीस येणार असल्याने रोहयो कंत्राटदार विजय भाषणवार याने सुपारी देऊन ओचावार यांचा तिघांनी धारदार शस्त्राने गळा चिरून, गळ्यावर, छातीवर व पोटावर वार करुन खुन करण्यात आला होता. या प्रकरणी मृतकाची पत्नी सोनल ओचावार हिच्या तक्रारीवरून पारवा पोलीसांनी तीन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करुन तपास सुरू केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे कडे सोपवला होता.

सदर प्रकरणातील आरोपी कंत्राटदार विजय भाषणवार (२४), जावेद मौला काठोटे (३५) व सुनिल टिप्पनवार (२७) सर्व रा. पारवा (देशमुख) यांना पारवा पोलीसांनी भादंवि कलम ३०२ अंतर्गत अटक करुन यवतमाळच्या कारागृहात रवानगी केली होती. सदर आरोपी हे आजही यवतमाळच्या कारागृहात अटकेत आहे.

सदर प्रकरणातील दुसरा आरोपी जावेद मौला काठोटे हा कारागृहात अटकेत असतांना तसेच दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याने त्याने यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात ॲड. विरेंद्र दरणे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आरोपी जावेद काठोटे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डाॅ. गौरी कवडीकर यांनी फेटाळून लावला आहे.

शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. अनिलकुमार वर्मा यांनी युक्तिवाद केला. फिर्यादी सोनलतर्फे ॲड. ए. के. चमेडीया यांनी तर, आरोपी जावेदतर्फे अँड. विरेंद्र दरणे यांनी न्यायालयात काम पाहिले.

सदर प्रकरण पारवा येथील रोजगार हमी योजना वन परिक्षेत्र कार्यालयातील कागदपत्रे माहितीचा अधिकार कायदा अंतर्गत मृतक ओचावार यांना प्राप्त झाल्याने पारवा येथील रोहयो वन परिक्षेत्र अधिकारी यांचे विरुद्ध असलेला गैरप्रकार व भ्रष्टाचार उघडकीस येउ नये म्हणून रोहयो कंत्राटदार विजय भाषणवार यांनी मृतक अनील ओचावार यांचा सुपारी देऊन खुन करण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय.

विशेष म्हणजे सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केला होता. त्यांना पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे आदींनी सहकार्य केले होते.