Home यवतमाळ रसातळाला गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी “कचाची” आवश्यकता..

रसातळाला गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी “कचाची” आवश्यकता..

289

व्यक्ती केंद्रित राजकरण ठरतेय पक्ष वाढीस बाधक, आकर्षक चेहऱ्याची वाणवा.

यवतमाळ/ हरीश कामारकर
एकेकाळी जिल्ह्यावर प्रभुत्व गाजविणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर आज मोठी अवळकला आली असुन जिल्हयाच्या राजकारणात पक्ष पुरता रसातळाला मिळत आहे. माजी जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर अंतर्गत हालचालीतून मे महिन्याच्या अखेरीस हायकमांडने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा अँड. प्रफुल मानकर यांच्या खांद्यावर दिली. जातीय समीकरण आणि स्वच्छ प्रतिमेची सांगड घालून नेमलेल्या जिल्हाध्यक्ष पक्षाला अँक्शन मोड वर आणतील अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. परंतु आजवरच्या जिल्हाध्यक्षाचां कार्यअहवाल कार्यकर्त्यांचा इच्छेस खरा उतरला नाही. यामुळे पक्षातील मरगळ दुर होण्या ऐवजी वाढीस लागली आहे.
काँग्रेस पक्षातून यवतमाळ जिल्ह्याने आजवर राज्यसह देशाला जवाहरलालजी दर्डा, वसंतराव नाईक, बाबासाहेब नाईक, शिक्षण महर्षी देवराव पाटील चोंडिकर, उत्तमराव पाटील, गुलाब नबी आझाद यांच्या सारखे नेते दिले तर अलीकडील काळात विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, मा. शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, सौ. संध्याताई सव्वालाखे, देवानंद पवार, सचिन नाईक यांसारख्या नेत्यांनी ही पक्षाच्या माध्यामतून राजकारणात आपल वलय निर्माण केलं. परंतु हे अलीकडील नेत्यांचे हे वलय स्वतः पुरते मर्यादित राहिल्याने पक्षाच्या वाताहतीचे कारण ठरले.
दरवेळेस काँग्रेस पक्षाने विदर्भाला झुकते माप दिले आहे. केंद्रात किँवा राज्यात काँग्रेस सरकार असताना अनेक कॅबिनेट, राज्यमंत्री आणि महामंडळाची पदे यवतमाळ जिल्ह्याच्या पदरात टाकली.

जातीय समीकरणाची गणित बसविण्यासाठी हायकमांडने नुकतेच अखिल भारतीय आदिवासीं काँग्रेसची देशाची जबाबदारी शिवाजीराव मोघे तर वफ्फ बोर्डाचे अध्यक्ष पद आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष पद डॉ. वजाहत मिर्झा, किसान सेलचे प्रदेशाद्यक्ष पद नाना पटोले यांचे निकवर्तीय देवानंद पवार आणि महीला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद संध्या सव्वालाखे यांना दिली. पक्षांतर्गत देशपातळी व राज्य पातळीवरील मोठमोठ्या जबाबदाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांकडे असल्याने जिल्ह्यात पक्ष बळकटीस प्रोत्साहन मिळायला पाहिजे होते परंतु यातीलच शिवाजीराव मोघे यांचा 2019 चा विधानसभेत भाजप उमेदवाराने पराभव केल्याने शिवाजी मोघे यांच्याकडील जनाधार व कार्यकर्त्यांची फौज कमी झाली तर मुस्लिम समाजाचे नेते म्हणून काँग्रेसने शिक्कामोर्तब केलेल्या डॉ.वजाहत मिर्झा यांना समाजाच्या बाहेर मानणारा फारसा वर्ग नाही. केवळ नाना पटोले यांचे निकटर्तीय असल्याच्या कारणाने देवानंद पवार यांना किसान सेलचे पद देण्यात आले. देवानंद पवार यांच्याकडून आजवर या पदाला साजेसा असा न्याय मिळालेला नाही. तर महिला आघाडी बळकट करून पक्षात महिलांची संख्या वाढेल या आशेने महीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची देण्यात आलेला सौ.संध्या सव्वालाखे यांचा कामाचा अहवाल ही पक्षास लाभदायक ठरला नाही.परिणामी जिल्ह्यात एकही विधानसभा आमदार निवडुन आला नाही. तर अलिकडील काळात जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी लाभलेले अँड. प्रफुल मानकर, बोटावर मोजण्याइतक्या कार्यक्रमातून जिल्हाध्यक्ष म्हणून दिसून आले. जिल्ह्याला नवीन जिल्हाध्यक्ष लाभून सुध्दा पक्ष अजून “ॲक्शन मोडवर” आला नसून राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची गत प्रादेशिक पक्षापेक्षाही वाईट झाल्याचे चित्र जिल्हयात आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर दिवसेंदिवस पक्ष बॅक फुटवर जात असल्याने येत्या काळात पक्ष जिल्ह्यातून नामशेष होतो की काय अशी भीती कार्यकर्त्यांना निर्माण झाली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यावयाचे असल्यास जिल्हा काँग्रेस ला नवसंजीवनी देण्यासाठी “कच” रूपी नेत्याची आवश्यकता असल्याचे मत राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.

 

####चौकट###
राज्यात काँग्रेसचा एकमेव खासदार जिल्ह्यात.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सर्वत्रच काँग्रेस पक्षाचे दाणादाण उडाली असुन चंद्रपुर आर्णी लोकसभा वगळता एकाही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडुन येवु शकले नाही. त्यामुळे राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर जिल्हा काँग्रेस ला बळ देतील अशी अपेक्षा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना होती. परंतु खासदारांनी केवळ मलिदेच्या ठिकाणी साम -दाम – भेदाचा वापर करून आपला हस्तक बसवून जिल्हा काँग्रेसचा वापर करून घेतल्याचे मत कार्यकर्त्यांचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची पक्ष वाढीची असलेली आशा सुद्धा पुन्हा निराशा जनकच ठरली आहे.

चौकट…

व्यक्तीकेंद्रित राजकारण ठरतय पक्ष वाढीस बाधक…
सर्वसमावेशक घटकाला सोबत घेउन राजकारण करणाऱ्या काँग्रेसने आदिवासीं, मुस्लिम, शेतकरी, महिला आणि युवा वर्गाला खुश करण्याच्या दृष्टीने संघटनात्मक देश पातळीवरील आणि राज्यांतील प्रमुख पदे ही जिल्हयात दिली. परंतु ही पदे वाटप करतांना नव्याना संधी देण्या ऐवजी जुन्या जाणत्या आणि एक पेक्षा जास्त पदे उपभोगणाऱ्या नेत्यांनाच दिल्याने पक्षात कित्येक वर्षांपासून गॉड फादर विना राबणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. पक्षांतर्गत चालु असलेले व्यक्तीकेंद्रित राजकारण ही पक्ष वाढीस बाधक ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.