Home यवतमाळ पशूजन्य आजार जनजागृती कार्यशाळा व रोगनिदान शिबीर

पशूजन्य आजार जनजागृती कार्यशाळा व रोगनिदान शिबीर

215

 

वर्ल्ड झोनोसिस डे निमित्त

यवतमाळ (प्रतिनिधी) : पशुसंवर्धन विभाग आणि श्री रुख्मिणी पांडुरंग संस्थानच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड झोनोसिस डे निमित्ताने पशूजन्य आजार जनजागृती कार्यशाळा व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 6 जुलैला सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे होणार असलेल्या उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातुन सहयोगी अधिष्ठाता डॉ आ. पा. सोमकुंवर, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सामूहिक स्वास्थ्य विभाग प्रमुख डॉ संदीप चौधरी यांचेसह नागपुरातील सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे यांची उपस्थिती असणार आहे. यवतमाळात पहिल्यांदाच होत असलेल्या या कार्यशाळा व शिबिरात जिल्ह्यातील पशुवैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यात वन्यजीव व पशुकल्याण क्षेत्रातील सक्रिय सेवाकर्ते व पशुसंवर्धन व आरोग्य विभागातील विद्यार्थी व संबंधितांची रक्त तपासणी होणार आहे. पशूंपासून मानवाला होणाऱ्या शेकडो जीवघेण्या व अन्य आजारांविषयी लक्षणे, प्रतिबंध, उपाय, रोगनिदान, चाचण्या, दक्षता, औषधोपचार आदी विषयी तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. मोकाट जनावरांच्या रेस्क्यू ऑपरेशन पासून तर शेल्टर मॅनेजमेंट पर्यंतच्या सेवकार्यात पशुसेवकांची भूमिका, महत्व, सुरक्षा आदी विषयावरही अनुभवी मार्गदर्शन होणार आहे. यावेळी जिल्ह्यात वन्यजीव तथा पशुकल्याण क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या संस्था संघटनांचा सत्कार होणार आहे. वन्यजीव, पशुकल्याण व आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी या कार्यशाळा व शिबिरास आवर्जून उपस्थित राहावयाचे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ क्रांती काटोले आणि श्री रुख्मिणी पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष डॉ दिनकर बडे यांनी केले आहे.