Home यवतमाळ सिडबॉल बनविण्याच्या 5 पद्धतींचा विस्तार

सिडबॉल बनविण्याच्या 5 पद्धतींचा विस्तार

485

 

(पर्यावरणप्रेमींनी बनविले 1 तासात 2000 सिडबॉल)

यवतमाळ (प्रतिनिधी) : प्रयास यवतमाळ तर्फे यवतमाळकर पर्यावरणप्रेमींना सिडबॉल बनविण्याच्या 5 पर्यावरणपूरक पध्दती शिकविण्यात आल्या. मार्गदर्शनानंतर झालेल्या 1 तासांच्या प्रात्यक्षिकामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तब्बल 2000+ सिडबॉल बनविले.


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रयासवन येथे झालेल्या कार्यशाळेत प्रयासी, पर्यावरणस्नेही, महाविद्यालयीन मुलांसह बालगोपालांनी त्यांच्या पालकांसह उपस्थिती लावली होती. वृक्ष पूजनाने प्रशिक्षणाची सुरुवात झाली. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरीताई मडावी यांनी कार्यशाळेचे उदघाटन करीत उपस्थितांना निसर्गसेवेसह शासनाच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी वनमंचावर भिल्ली पँटर्नचे बीजपुरुष रमेशकाका साखरकर, अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रयासी सुधाताई पटेल यांच्यासह प्राचीताई बनगीनवार यांची उपस्थिती होती.
वृक्ष लागवडीतून त्याचे संगोपन व संवर्धनाचा संदेश देत चिमुकल्यांची नाळ मातीशी जुळून राहण्याकरिता सिडबॉल प्रशिक्षण व निर्मितीचा उपक्रम घेण्यात आला. या विषयातील अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता खंडेराव यांनी प्रात्यक्षिकांसह सिडबॉल बनविण्याचे कौशल्य उपस्थितांना अवगत करून दिले. यामध्ये मातीच्या पारंपरिक सिडबॉलपासून तर टाकाऊ सुती कापड, रद्दीतील न्यूज पेपर, सर्वत्र सहज उपलब्ध असलेली पळसाची पाने यापासून सिडबॉल बनविण्याच्या साध्या सोप्या टिप्स दिल्या. यादरम्यान झालेल्या बालगीताने प्रशिक्षणार्थींमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती होऊन मनोरंजनही झाले. कार्यशाळेत महाविद्यालयांमधील एनएसएस चमू, एनसीसी ग्रुप, ड्राँइंग व स्पर्धा क्लासचे विद्यार्थी मंडळींनी अगदी खेळी मेळीच्या वातावरणात तासाभरात दोन हजार सिडबॉल तयार केले. विद्याताई नरहरशेट्टीवार यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या कल्पनाताई देशमुख यांनी सूत्र संचालन केले तर डॉ. आशाताई देशमुख यांनी आभार मानले.
कार्यशाळेकरिता आयोजन समितीचे डॉ विजया कावलकर, अश्विन सवालाखे, मुकेश पटवा, ऍड अमोघ व्होरा, महेंद्र गुल्हाने, प्रशांत बनगीनवार, प्रशांत गोडे, सुदेश कापर्ती, वसंत उपगनलावार, प्रमोद यादव, मंगेश खुणे, अनिल मुक्कावार, आरतीताई मुक्कावार, वीरेंद्र चौबे, सुशील बत्तलवार, प्रतीक डहाके, अभिजित गुल्हाने, राजुभाऊ तोंडरे आदी प्रयासींनी सहकार्य केले.

चौकट
600 वृक्षांची नैसर्गिक लागवड – बीजप्रक्रिया करून तयार झालेले विविध फळझाडांकरिताचे सिडबॉल वाळल्यानंतर माळरानाच्या कडेला बालगोपालांच्या हस्ते भिरकविण्यात येणार आहे. सिडबॉलची कीमान 30 टक्के उगवण क्षमता असली तरी या प्रयोगातून 600 पेक्षा जास्त रोपवनाची निर्मिती होणार आहे.