
नगर परिषद, समिती व जेष्ठांचा पुढाकार

यवतमाळ (प्रतिनिधी) : वृक्ष, पाणी, प्लास्टिक आणि पशुकल्याण विषय गंभीर होत चालले असून त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते आहे. ही निकड हेरून पर्यावरण संरक्षण समिती, नगर परिषद आणि जेष्ठ नागरिक मंडळाने यवतमाळात पर्यावरण व पूरक क्षेत्रात सेवारत संस्थांची मोट बांधली. यानिमित्ताने जागतिक पर्यावरणदिनी राज्य पातळीवरील कार्यकुशल संस्थांच्या तज्ञ, अभ्यासू समाजसेवकांची जणू मांदियाळी जेष्ठ नागरिक भवनात अवतरली होती. कुणी संकल्प केले, कुणी ठराव घेतला, कुणी नियोजन केले तर कुणी प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली. शहरात पहिल्यांदाच अशी स्वयंस्फूर्त व पर्यावरणस्नेही कार्यशाळा सक्रिय झाली. पर्यावरण कविता प्रदर्शनाचे उदघाटन व वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यशाळेत वर्धा व नागपुरहुन आलेले श्री अनिल जोशी यांनी संस्था व्यवस्थापन, डॉ सचिन पावडे यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग, करिश्मा गालानी यांनी पशुकल्याण तर श्री अजिंक्य कोट्टावार यांनी पर्यावरणपूरक संशोधन व तंत्रप्राणालींबद्दल रोचक माहिती देऊन उपस्थित युवकांना समाजकार्यातून नव्या रोजगार व स्वयंरोजगाराची ओढ निर्माण करण्याची दिशा दाखविली. आपल्या प्रास्ताविकातून मुख्याधिकारी माधुरीताई मडावी यांनी यवतमाळकर, संस्थाचालक, पर्यावरणप्रेमी, महिला, बालक, जेष्ठ आदी सर्व समूह व घटकांना नगर परिषदेच्या शहर सौदर्यीकरण व स्वच्छता उपक्रमात आवर्जून सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रा. विजय देशपांडे यांनी सूत्र संचालन केले तर सुनील वासनिक यांनी आभार मानले. समारोप सत्रात शहरात विविध क्षेत्रात सेवारत असलेल्या 18 संस्थांच्या पदाधिकऱ्यांचा पर्यावरणपूर्वक किट देत सन्मान करण्यात आला. मंचावरील बळवंतराव चिंतावार व मुख्याधिकारी यांच्याहस्ते कार्यशाळा संयोजक अश्विन सवालाखे आणि संतोष भोयर यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा संकल्प व राष्ट्रगीताने या नाविन्यपूर्ण कार्यशाळेचा समारोप झाला. आयोजनाकरिता विनोद सहस्त्रबुद्धे, डॉ विजय अग्रवाल, अण्णाभाऊ आरेवार, राहुल दाभाडकर, प्रियंका फुकटे, माधुरी चावरे, समीर भांडेगावकर, आशिष यादव आदींनी सहकार्य केले.
चौकट
99% इको फ्रेंडली कार्यशाळा – ही कार्यशाळा 99% इको फ्रेंडली ठरली. प्लास्टिक फ्री आणि पेपरलेस कार्यशाळेचे उपस्थितांमध्ये कौतुक झाले. कार्यक्रमात स्टील व काचेचे प्लेट व ग्लास वापरण्यात आले. ना, पत्रिका, ना पॉम्प्लेट, प्लास्टिकचे साहित्यही नव्हते.
अतिथींनाही शेणाची कुंडी, त्यात रोपं, पर्यावरण विषयाचे पुस्तक व कॅलेंडर हे सर्व ज्युटच्या हॅन्डमेड पिशवीत प्रदान करण्यात आले.
चौकट
जुनमध्येच पर्यावरणपूरक मोहीम – कार्यशाळेच्या निमित्ताने व कार्यशाळेतही पर्यावरण विषयक अनेक विषयांवर मंथन झाले. आता बैठक, चर्चा व कार्यक्रम टाळून जूनमध्येच एखादी पर्यावरणपूरकमोहीम सुरू करण्याचा मनोदय सर्व संस्थांच्या सेवेकऱ्यांनी केला आहे.











































