
(एस.एल. फाउंडेशनची स्थापना)

यवतमाळ (प्रतिनिधी) : दाते कॉलेजमधून 25 वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्या तरुणांनी पर्यावरणदिनी एकत्र येत वृक्षारोपण करीत पर्यावरण सेवेचा संकल्प केला. जेष्ठ नागरिक भवन येथील दादा दादी पार्कमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
कॉलेज जीवनापासून आदर्श प्राचार्य डॉ. सु. ल. देशपांडे यांच्या नावाने सुरू केलेल्या एस.एल. ग्रुपचे रूपांतर आता एस. एल. फाउंडेशन मध्ये झाले आहे. रविवारी माजी विद्यार्थ्यांनी 25 वर्षानंतर पुन्हा एकदा महाविद्यालयात एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कुणी वर्षानंतर भेटले, कुणी दशकानंतर भेटले तर कुणी तब्बल दोन तपानंतर भेटले. उत्साह, विचारपूस, चर्चेनंतर आपण समाजाचं व निसर्गाचं देणं लागत असल्याच्या भावनेतून पर्यावरण सेवेचा संकल्प सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर प्राचार्या कल्पनाताई देशमुख यांनी भेट व आशीर्वाद घेत हा मनोदय त्यांच्याकडेही व्यक्त केला. महाविद्यालयाच्या सहकार्याने ऑगस्टमध्ये सहकुटुंब माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात येणार असून याच दिवशी एखादा मोठा पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याचेही निश्चित झाले.
यावेळी फाउंडेशनचे सर्वश्री अतुल टाके, जीवन पळसोकर, संदीप नार्लावार, अश्विन सवालाखे, महेश ढवळे, चंद्रहास हेगडे, प्रा. सचिन जयस्वाल, शंकर मडावी, गीतेश पोबारु, राजू बळी, उमेश शर्मा, अँड मनीष हनुमंते, मेहुल वाघेला, आशिष गायकी, बाळ देशपांडे, मंगेश आजने, हेमंत फुंदे, अविनाश बोबडे, वैभव टप्पे, विलास लोहकरे, अभय पोलादे, सचिन पारोदे, श्रीकांत आजनसरे आदींची उपस्थिती होती. बाहेर राज्यात तसेच बाहेर देशात असलेले सदस्य गुगलमीटद्वारे सहभागी झाले होते.











































