Home यवतमाळ घाटंजी न्यायालयाने सहा वर्षापुर्वी आदेश देऊनही आरोपी विरूध्द अद्यापही गुन्हे दाखल नाही..?

घाटंजी न्यायालयाने सहा वर्षापुर्वी आदेश देऊनही आरोपी विरूध्द अद्यापही गुन्हे दाखल नाही..?

350

➡️ तत्कालीन ठाणेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील जरूर येथील फिर्यादी शाबुद्दीन दोस्तमोंहमद मेघाणी (४६) यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १५६ (३) अंतर्गत दाखल तक्रारीवरून घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर. यु. इंगळे यांनी २४ आँगस्ट २०१६ रोजी आरोपी/गैरअर्जदार घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत लक्ष्मण पोतराजे (३६), नारायण कुरमिलकर (६०), रविंद्र कुरमिलकर (३८), संतोष कुरमिलकर (३५), लक्ष्मण कुरमिलकर (३६)व भारत कुरमिलकर (३४) आदींविरुद्ध भादंवि कलम ४४७, ४४८, २९४, ५०६, १४३, १४७ अंतर्गत गुन्हे दाखल करुन ३० दिवसाच्या आंत अहवाल दाखल करण्याचे आदेश घाटंजी पोलीसांना दिले होते. मात्र, ६ वर्ष लोटुनही घाटंजी पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हे दाखल न केल्याने तत्कालीन ठाणेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन, न्यायालयाची अवमानना केल्याची कारवाई करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. फिर्यादी शाबुद्दीन मेघाणी यांची बाजु अँड. गणेश धात्रक यांनी मांडली.
फिर्यादी शाबुद्दीन मेघाणी व संशयीत आरोपी हे जरुर येथील रहिवाशी आहे. मेघाणी यांनी दाखल केलेल्या सांत आरोपीपैकी लक्ष्मण हरिभाऊ पोतराजे यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे नांव तक्रारीतुन कमी करण्यात आले असून मेघाणी यांच्या मालकीची व ताब्यातील ३४*३० फुट लांबी रुंदीची वार्ड क्रमांक २ मध्ये मालमत्ता क्रंमाक २५ जरुर येथे जागा आहे. सदर जागेवर टिनाच्या शेड मध्ये पिठाची गिरणी सुरु आहे. सदरची जागा या पुर्वी लक्ष्मण पोतराजे यांच्या मालकीची होती. त्यांचे कडुन फिर्यादीचे वडील दोस्तमोंहमद मेघाणी यांनी विकत घेतले होते. तेव्हा पासून सदर जागेवर शाबुद्दीन मेघाणी यांचा ताबा व वापर आहे. तसेच जरुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा त्या जागेची नोंद आहे.
२४ जुन २०१६ रोजी फिर्यादी शाबुद्दीन मेघाणी हा सकाळी ११ वाजता आपल्या किराणा दुकानात हजर असतांना लागुन असलेल्या पिठाची गिरणीच्या जागेजवळ आरोपी क्रमांक १ ते ६ व मय्यत लक्ष्मण हरिभाऊ पोतराजे हे अचानक पणे एकत्रितपणे, संगणमताने, गैर कायद्याची मंडळी घेऊन आले. आरोपींनी बांबुच्या कमच्याचे तट्टे आणुन दादागिरी करुन फिर्यादीच्या मालकीच्या जागेवर कुंपण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आरोपींनी फिर्यादीस अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. घटनेच्या वेळी सुलतान मेघाणी, बाळु पोहणकर, पांडुरंग आत्राम व ईतर गावातील नागरिक घटनास्थळी हजर होते. या बाबत शाबुद्दीन दोस्तमोंहमद मेघाणी यांनी २५ जुन २०१६ रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी रिपोर्ट दाखल केला. मात्र, दखलपात्र गुन्हा असतांना सुध्दा घाटंजी पोलीसांनी गुन्हा नोंदवला नाही. परंतु पोलीस स्टेशन अंमलदार यांनी २५ जुन २०१६ रोजी साना क्रमांक २३/१६ नोंदविला होता.
सदर प्रकरणात घाटंजी पोलीसांनी गुन्हा नोंदवला नसल्याने फिर्यादी शाबुद्दीन मेघाणी यांनी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर. यु. इंगळे यांच्या न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत किरकोळ फौजदारी अर्ज क्रमांक ९२/२०१६ दाखल केला. त्या वरुन घाटंजी न्यायालयाने घाटंजी पोलीसांना आरोपी विरूध्द २४ आँगस्ट २०१६ रोजी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, ६ वर्ष लोटुनही अद्यापही आरोपी विरूध्द गुन्हे नोंदविण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. फिर्यादी पक्षातर्फे अँड. गणेश धात्रक यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
दरम्यान, सदर प्रकरण घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश एफ. टी. शेख यांच्या न्यायालयात रोजनाम्यानुसार रिपोर्ट (Report) साठी आहे, हे येथे उल्लेखनीय.