गंगाखेड /प्रतिनिधी
सीमेवरील जवानांचा त्याग खूप मोठा आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित असून त्या त्यागाचा विसर पडू देऊ नका असे आवाहन ह भ प रोहिदास महाराज मस्के यांनी बुधवारी राणीसावरगाव येथे आयोजित कीर्तनात बोलताना व्यक्त केलं.
सामाजिक कार्यकर्ते नारायणराव डोणे यांच्या आईच्या गोडजेवण निमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, वाघलगावचे माजी सरपंच नारायण घनवटे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान चे रामेश्वर भोसले, सय्यद मुदस्सीर बाबासाहेब भोसले, सखाराम धनवटे, ह भ प मदन महाराज फटांगे, बाळू महाराज बहादुरे ,यादव महाराज आदीसह उपस्थिती होती. पुढे बोलताना मस्के महाराज म्हणाले की जगात निस्वार्थीपणे प्रेम फक्त आईच करू शकते. त्यामुळे आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांचा चांगला सांभाळ मुलांनी केला पाहिजे. अति परिचयामुळे आपले महत्त्व कमी होत असते .त्यासाठी स्वतःचे महत्त्व ओळखून आपण वागले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी केले. हा देश जवानांच्या त्यागाच्या पायावर उभा असून देशातील जवानांच्या त्यागाचा विसर आपण पडू देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. नारायण डोणे यांनी सर्वांचे आभार मानले .यावेळी परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.