Home मराठवाडा जालन्यात इन्नरव्हील होरायझनच्या जयपूर फुट शिबिराचा 79 जणांना लाभ

जालन्यात इन्नरव्हील होरायझनच्या जयपूर फुट शिबिराचा 79 जणांना लाभ

481

कुणाच्या तरी आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा हा उद्देश असून अपघात अथवा काही आजारामुळे पाय गमावलेल्या महिला आणि पुरुषांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी माणुसकीच्या नात्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. माणूसच माणसाच्या कामी येतो, कुणाच्या तरी आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावे, या दृष्टिकोनातून आयोजित जयपूर फूट शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, याचे आत्मिक समाधान लाभते, अशी प्रतिक्रिया इन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्षा सौ. नेत्रा भक्कड यांनी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना दिली.

जालना- लक्ष्मण बिलोरे

 – सामाजिक शैक्षणिक, आरोग्य या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्यावतीने आणि सांगली येथील उषामोहिनी विकलांग पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने जालना येथे आज मंगळवारी (दि. 28) रुक्मिणी गार्डनमध्ये पार पडलेल्या मोफत जयपूर फूट अर्थात कृत्रिम पाय वाटप शिबीराचा ७९ जणांनी लाभ घेतला, अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा सौ. नेत्रा मनमोहन भक्कड यांनी दिली.

     या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे असोसिएशनच्या सेक्रेटरी  सौ. अनुराधा चांडक( सोलापूर) यांच्याहस्ते झाले. अतिथी म्हणून उषा मोहिनी विकलांग पुनर्वसन केंद्राचे संस्थापक रो. मोहिनीभाई देसाई (सांगली), संचालिका नंदा झाडबुके  यांची तर व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा सौ. नेत्रा भक्कड, सचिवा सौ. श्रीया गेलडा, प्रोजेक्ट प्रमुख सारिका अग्रवाल यांची उपस्थिती होती. डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांनी झूमद्वारे या शिबिराला उपस्थिती लावून शिबिराचे कौतुक करुन  शुभेच्छा दिल्या.

    या शिबिरात अपघात अथवा आजाराने पाय गमावलेल्या 79 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या सर्वांना यावेळी मोफत कृत्रिम पाय बसविण्यात आले. आता चालता येणार असल्यामुळे या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. त्यांनी क्लबचे मनापासून आभार मानले.

     यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात इन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि अशा प्रकारचे उपक्रम राबविणे खऱ्या अर्थाने काळाची गरज बनली असल्याचे सांगितले. 

    प्रारंभी श्रीया गेलडा यांनी सादर केलेल्या क्लबच्या प्रार्थनेनंतर  सारिका अग्रवाल यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. त्यानंतर जयपूर फूट शिबिरासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या एसआरजे पीत्ती ग्रुप, अक्षत झुनझुनवाला, कलश सीड्स प्राइवेट लिमिटेड, रुक्मिणी गार्डनचे संचालक सुरेश मगरे तसेच क्लबच्या अनेक दानशूर सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पायाचे मोजमाप घेऊन शिबिरासाठी पाय बनवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. 

उषामोहिनी विकलांग पुनर्वसन केंद्राच्यावतीने इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनचा सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. नेत्रा भक्कड यांनी केले तर आभार उर्वशी खंडेलवाल यांनी मानले. शिबिराच्या लाभार्थ्यांना सौ. सपना गर्ग यांच्यावतीने जेवण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मोनाली भक्कड व सौ. नेहा पाटणी यांनी केले. या शिबिराला क्लब सदस्या, लाभार्थ्यांसह नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रकल्पप्रमुख सारिका अग्रवाल, डॉ. विभा लाहोटी यांच्यासह नम्रता पीत्ती, आरती भक्कड,

श्रेया गेलडा, बनप्रीत झुनझुनवाला, पूनम अग्रवाल, अमृता  मिश्रीकोटकर, दिपाली पाटणी आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.