Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीला लागले सुरूंग,उपसरपंचासह सदस्यांनी ठोकला शड्डू…!

कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीला लागले सुरूंग,उपसरपंचासह सदस्यांनी ठोकला शड्डू…!

1228

लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून गाव अंतर्गत विकास कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वास दाखवला जात आहे.सरपंच पुत्राचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप वाढला असल्यानेच गावच्या विकासकामाला खिळ बसली असल्याचा आरोप उपसरपंचासह सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या पुत्रासह नातेवाईकांचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप वाढला असून सरपंच पुत्र ग्रामपंचायतीच्या कागदपत्रावर स्वाक्षरी पण करत आहेत.हि बाब उपसरपंचासह सदस्यांनी अनेक वेळा ग्रामविकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली तरी पण ही गंभीर बाब बंद होण्याऐवजी वाढत आहे. विकासनिधी संदर्भात विचारणा केल्यावर सरपंचपुत्र हस्तक्षेप करून ‘ते पैसे आमचे आहेत,ग्रामपंचायत निधी कुठे आणि कसा खर्च करायचा ते मी बघतो’.सरपंच पुत्राच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप वाढल्याने विकास कामाबाबतीत उपसरपंचासह सदस्यांना निर्णय घेणे अवघड झाले आहे.गावात विविध समस्या आहेत.सांडपाणीनाल्या तुंबलेल्या आहेत.गटाराच्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून गावात मलेरियाच्या रूग्ण वाढले आहेत.पाणी पुरवठा योजना बंद आहे.अतिवृष्टीमुळे रस्ते खचले आहेत.१५ व्या वित्तआयोगाचा निधी खर्च न करता यामध्ये अपहार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे उपसरपंच, सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर केली जात आहेत.गावच्या विकास कामाकडे लक्ष देवून , उपसरपंचासह सदस्यांना विश्वासात घेतले जावे, सरपंच पुत्रासह नातेवाईकांचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप रोखण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.