
गणरायाचे वाजत-गाजतआगमन झालं आबालवृद्धांपापासून साऱ्यांनीच आनंदाच्या पायघड्या अंथरून श्रींचे स्वागत केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा होतोय ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल, अनेकांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही सार्वजनिक सण-उत्सव कोणत्याही नियमांना न जुमानता साजरे करण्याचा वारू चौफेर उधळण्याचे मनसुबे रचत समाजमन कलुषित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण तो सपशेल फेल ठरला.केवळ गणेशोत्सवच नाही तर कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक सणवार कसे साधेपणाने साजरे होतील यासाठी सरकार सावध भूमिका घेऊन वावरत असताना सरकारच्याच भूमिकेला हरताळ फासत अनेकांनी सण उत्सव साजरे करण्याचे जणू आव्हान देऊन जनतेच्या दरबारात हिरो होण्याचा आणि माध्यमातून आपली छबी मिरवण्याची संधीही अनायासे मिळवली.कधीही मंदिरांचे तोंड न पाहणारी मंडळी हातात मागण्याचे फलक घेऊन मंदिर उघडले जावे यासाठी भांडत होती अगदी काल -परवा पर्यंत हे सुरूच होतं आणिअजूनही सुरूच आहे. कोरोनाने कुटूंबच्या कुटुंब मातीत गेली त्यांच्या ज्वाला अजून धगधगत आहेत, तर दुसरीकडे सारे काही आलबेल आहे असा समज पसरवत जन आशीर्वादासाठी तुताऱ्या निनादत आहेत.सगळे कसे ढवळून निघत आहेत,यातच पावसानही थैमान घातलं आभाळात पाणी आणि डोळ्यांत पाणी त्याचबरोबर स्वप्नांचेही पाणी झाले. डोळ्यादेखत शेती वाहून गेली, तर दुसरीकडे बाजारभाव नसल्याने सोन्यासारखा शेतमाल रस्त्यावर ओतून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली.सांगण्याचं तात्पर्य हे की जसे गणरायाचे झाले तसे जणू बाप्पा लगेच पावन झाल्याच्या आविर्भावात काही माध्यमे टाहो फोडताना दिसत आहेत.अमुक एक नेत्याने कोरोना नष्ट होण्यासाठी गणपतीला साकडे घातले . तमक्याने पुन्हा वेगळे साकडे घातले, अरे जर गणपतीचं हे सारे करून घेणारा आहे तर तुमची गरजच काय? जनता पुढाऱ्यांकडे येते आणि पुढारी देवाला साकडं घालण्यात दंग झालेत एखादया माध्यम प्रतिनिधीने एखाद्या नेत्याला तुमच्याकडे जनता किती साकडे घालत आहेत तुम्ही पावन झाला तरी पुरे ! असा प्रतिप्रश्न केला असता तर पारदर्शी पत्रकारितेचा आनंद वाटला असता पण दुर्दैवाने तसे घडतांना दिसले नाही. असो , या उल्लेखिलेल्या गोष्टींकडे गंभीरपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकमेकांना संपवण्याची भाषा माध्यमासमोर बिनधास्तपणे नेते करत आहेत. एकमेकांवर आरोप करून आपणच कसे चर्चेत राहू यासाठी कोणत्याही थराला जाऊन राजकारणाची दिशाच बदलून टाकत आहेत.कोरोनाच्या काळात आईवडील गमावलेले पाल्य आज नेत्यांची वाट पाहत आहेत. या निराधार मुलांचे कुणी सर्वेक्षण केले का ? त्यांना मदत मिळवावी म्हणून कुणी आग्रह धरला का ? असे अनेक प्रश्न आज घडीला आ वासून उभे आहेत. जिल्हा परिषदेचे गुरुजी हे नेक कांम राबवताना दिसत आहेत मात्र ऊर बडवत मंदिरे खुली करा म्हणवणाऱ्या एकाही नेत्याचा चेला या कामात कुणाला आढळला नाही, शेतकरी पीक विम्याची रक्कम अदा करावी म्हणून भांडत आहेत, अगदी अपवादाने एखाद्या आमदाराने याकामी आवाज उठवला असेल, बाकी कुणी दिसले नाही.खरेच सुखकर्ता असणारे कारभारी जरी पावन झाले तरी खूप काही मिळाले याचा आनंद मिळेल, म्हणून पुढाऱ्यांनी जनतेने घातलेले साकडे पाहावे मग गणपतीच्या आरत्या ओवळाव्या.
*अमर ठोंबरे, पत्रकार संरक्षण*समिती जिल्हा समन्वयक नाशिक*
*मो 9325527180*









































