
जालना-लक्ष्मण बिलोरे
अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीपिकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी पाहणी केली.शेतीला प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी करुन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की,शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत आहे.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही टोपे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.
या पाहणी प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड,जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस,तहसीलदार विद्याचरण कडवकर,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब कणके,संजय गांधी निराधारचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब नरवडे,सहदेव भारती,दत्ता केजभट,अंगद काळे,संजय कणके,महादेव तांबडे,गजानन चौधरी,अर्जुन चौधरी,गोवर्धन तांबडे,विठ्ठल झिजुर्डे,विशंबर गारुळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी,कार्यकर्ते यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की,अंबड तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावात शेतपिकांचे नुकसान झाले असून मूग,कापूस,सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर ऊस पीक आडवे झाल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे.पिकांबरोबरच काही ठिकाणी रस्ते,पूल तसेच जनावरांचेही नुकसान झाले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार या अतिवृष्टीमुळे ३ हजार हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे.झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे सांगत झालेल्या नुकसानीची माहिती मंत्रीमंडळासमोर ठेऊन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री टोपे यांनी पाथरवाला बुद्रुक,राजेश नगर,महाकाळा,बळेगाव,साष्ठ पिंपळगाव,दह्याला,भांबेरी, धाकलगाव,वडीगोद्री,चंदनापुरी खुर्द आदी ठिकाणी झालेल्या नुकसानाची पाहणी करत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नुकसानाची माहिती घेतली.











































