
जालना- लक्ष्मण बिलोरे
इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्यावतीने गर्भाशय पिशवी कॅन्सर मोफत निदान शिबिर जालना येथील दुर्गामाता रोडवरील मिशन हॉस्पिटलमध्ये आठवड्यातून तीन दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, महिलांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबच्या अध्यक्ष सौ. नेत्रा मनमोहन भक्कड यांनी केले केले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना नेत्रा भक्कड यांनी सांगितले की, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. प्रज्ञा कोयलकर आणि मिशन हॉस्पिटलच्या डॉ. मोनिका मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून 3 दिवस हे शिबिर घेण्यात येणार आहे. धकाधकी, या धावपळीच्या आयुष्यात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाला मुळी वेळच नाही. त्यातल्या त्यात महिला लक्षच देत नाहीत. सुरुवातीला कदाचित कोणतीही लक्षणे न दाखवता अतिशय धीम्या गतीने वाढणारा आजार म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर होय. गर्भाशयाचा कर्करोग साधारणपणे साठी ओलांडल्यानंतर उद्भवणारा हा आजार 80 टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर आढळतो. पूर्व टप्प्यावर या गर्भाशय कर्क रोगाचे निदान होणे कठीण असते. कारण बहुतांश स्त्रिया ह्या आजाराच्या प्रतिबंधात्मक तपासणीसाठी पुढे येत नाहीत. एचपीव्ही नावाच्या विषाणूंचे संक्रमण हे जवळ जवळ सर्वच गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण आहे. कुटुंबांमध्ये हा अनुवांशिक असू शकतो. मौखिक गर्भनिरोधक गोळ्यांच्या दीर्घकाळ सेवनाने हा धोका वाढू शकतो; पण या गोळ्या बंद केल्या की, धोका कमी होतो, अशी माहिती नेत्रा भक्कड यांनी दिली.
नियमित तपासणी केली तर त्या तपासणीमध्ये खरोखर आपण सुरक्षित आहोत का, याची खात्री पटते. कर्करोगाची लक्षणे म्हणजे रक्तस्त्राव होणे, पांढरे पाणी जाणे, शारीरिक संबंधानंतर रक्तस्राव होणे, ओटीपोटात दुखणे, कधी-कधी गर्भाशयाच्या मुखाचा मोठी गाठ असणे व त्यातून जास्त रक्तस्त्राव होणे, असेही दिसून येते. सर्वाधिक सामायिक लक्षण म्हणजे
योनीमार्गातून पांढरा किंवा लाल स्त्राव जाणे, अस्वाभाविकरीत्या होणारा रक्तस्त्राव, मासिक पाळी दीर्घकाळ राहणे आणि पूर्वीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होणे; पण कधीकधी तिसऱ्या स्टेजपर्यंत या रोगाची सुस्पष्ट अशी लक्षणे दिसून येत नाहीत, हीच काळजी वाटणारी बाब आहे. पॅप स्मियर किंवा पॅप टेस्ट म्हणजे स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी. यापैकी पॅप स्मियरच्या साह्याने सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास त्यातून वाचण्याची शक्यताही वाढते. या कर्करोगाला स्त्रियांनी व्यवस्थित समजून घेऊन योग्य ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे व प्रतिबंधात्मक चाचण्या करणे गरजेचे आहे. स्त्रियांनी निसंकोचपणे तपासणी करून घ्यावी. मासिक पाळीमध्ये तपासणी करता येत नाही. मासिक पाळीच्या सहाव्या-सातव्या दिवशी तपासणी करता येते. शिबिरामध्ये कोणी गरजू महिलेला काही लक्षणे आढळून आली तर तिच्या पुढील उपचारासाठी इन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन मदत करणार आहे. सर्व महिलांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबच्या अध्यक्षा सौ. नेत्रा भक्कड यांनी केले आहे.











































