
- विनोद पत्रे
प्रवाश्यांना तिकीट दिल्यानंतर रूट बदल करीत असताना तिकीट मशिनमध्ये स्फोट होऊन कर्तव्यावर असलेली महिला वाहक गंभीर जखमी झाल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास येथील गोंदिया मुख्य बसस्थानक परिसरात घडली. कल्पना मेश्राम असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी 26 ऑगस्ट रोजी रामनगर पोलिस ठाण्यात सदर महिला वाहकाने तक्रार दाखल केली आहे.
महिला वाहक कल्पना मेश्राम या अहेरी एसटी आगारात कर्तव्यावर असून 25 ऑगस्ट रोजी त्या चालक लिलाधर मडावी रा. अहेरी यांच्यासह अहेरी-गोंदिया एसटी बस क्रमांक एमएच 40 ए. क्यू. 6327 मध्ये कर्तव्यावर होते. दरम्यान, दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास सदर बस गोंदियाच्या मुख्य बसस्थानकावर पहोचली.
यावेळी तेथील पार्सल कार्यालयाजवळ प्रवासी उतरल्यानंतर वाहक मेश्राम या मशीन मधील रूट बदल करत असताना अचानकच मशीनमध्ये स्फोट झाला. यावेळी बस मधील चालक व बसस्थानकावरील इतर रापमच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना मेश्राम यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. विशेष म्हणजे, मशीन त्यांच्या उजव्या हातात असल्यामुळे त्यांचा उजवा हात संपूर्ण भाजला असून निकामी झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी महिला वाहक कल्पना मेश्राम यांनी गुरुवारी 26 ऑगस्ट रोजी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.











































