
अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर देखील कारवाई होत नसल्याचा आरोप

आरे-आरे दुग्ध वसाहतीतील मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड व सहाय्यक सुरक्षा अधिकारी विजय वाघ यांच्या आशीर्वादाने शासनाच्या मोकळ्या जागेवर बांधकाम करून ही जागा पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा बनवून खरेदी विक्री केली जात असून आयुक्त दुग्धव्यवसाय विकास विभाग हे माहिती दिल्यानंतर देखील कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक पत्रकार निलेश ह. धूरी यांनी आमचे पत्रकार “रवी गवळी” यांच्याशी बोलताना केला.
निलेश धुरी यांनी आरे दुग्ध वसाहतीतील मयूर नगर याठिकाणी शासनाच्या जागेवर अनधिकृत झोपडी बांधून ती साडेतीन लाख रुपयाला विक्री केल्याचे गंभीर प्रकरण समोर आणले असून त्याबाबत त्यांनी दिनांक 8 मार्च रोजी दुग्ध खात्याकडे व पोलिस विभागाकडे ठोस पुरावे जोडून तक्रार केली असून अद्याप संबंधित भूमाफिया वर कोणतीही कारवाई झाली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
आरे वसाहतीतील मयुरनगर येथील रईस यासीन अन्सारी याने एप्रिल २०१६ साली ३,५०,०००/- रूपयांस ( तीन लाख पन्नास हजार रुपये ) खरेदी केलेली झोपडी अनधिकृत असून बेकायदा असल्याची बाब समोर आली आहे.आरे प्रशासनाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या कागदपत्रांवरून ही झोपडी शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा बांधून विकल्याचे स्पष्ट झाले आहे.
रईस यासीन अन्सारी याच्या बेकायदा घराबाबत आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.७ डिसेंबर २०२० रोजी नोटीस बजावून सदर घर अनधिकृत असल्याने सदर घराचे आपण स्वतः निष्कासन करावे. अन्यथा आपण मयुरनगर येथील राॅयल पाम्स गेट जवळील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकामाची या कार्यालयामार्फत निष्कासन कार्यवाही केली जाईल.व सदर निष्कासन कार्यवाहीमुळे होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतःच सर्वस्वी जबाबदार रहाल. याची नोंद घ्यावी. असे म्हटले आहे. परंतु नोटीस देऊनही रईस यासीन अन्सारी याने दुर्लक्ष केल्याने दि. २१-१२-२०२० रोजी कार्यालयीन सूचनेद्वारे सुरक्षा विभागास सदर अनधिकृत घरावर व गिफ्ट शाॅपवर त्वरीत निष्कासनाची कार्यवाही करण्याची सूचना करून केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयास सादर करण्यास सांगितले होते. परंतु सुरक्षा विभागाकडून अद्याप पर्यंत तशी निष्कासनाची कार्यवाही झालेली नाही.
दि.३१-८-२०१६ रोजी रईस यासीन अन्सारीने घराचा पुरावा म्हणून बोगस कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.सदर पत्रात रईस म्हणतो की माझे राॅयल पाल्मस् जवळील घर १९९२ पासून असून ते संरक्षणपात्र आहे.आणि पुरावा म्हणून त्याने पुढील कागदपत्र जोडले आहेत.
१) ५००/- रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेल्या खरेदीखताची झेरॉक्स प्रत.
२) दि. ३-९-२०११ रोजी मृत्यू पावलेल्या शिराड लाडक्या ठाकरे याच्या रेशनकार्डाची झेरॉक्स प्रत
३). शिराड ठाकरेच्याच सन २०१६ व२०२० सालच्या लाईट बिलांच्या झेरॉक्स प्रती.
४). २००० साली महापालिकेकडून ओळख पत्रासाठी झालेल्या सर्वेच्या पावतीची झेरॉक्स प्रत.
५). विनोद शिराड ठाकरे याच्या खांबाचा पाडा येथील मतदार ओळखपत्राची झेरॉक्स प्रत
६). शिराड लाडक्या ठाकरे याच्या मृत्यू प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत दिली आहे.पुरावा म्हणून दिलेल्या या कागदपत्रात एप्रिल २०१६ साली केलेले खरेदी खत सोडले तर रईस अंसारीच्या नावाचा त्या कागदपत्रात कुठेही उल्लेख नाही यावरून रईस यासीन अन्सारी याने खरेदी केलेले बेकायदा घर वाचवण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या मयत माणसाचे व इतर व्यक्तींचे पुरावे जोडून शासनाची फसवणूक करीत असल्याचे दिसून येते.खरेदी केलेले घर अनधिकृत असल्याने त्याने केलेला खरेदी विक्रीचा व्यवहार देखील बेकायदा ठरतो.
रईस यासीन अन्सारी शासनाची फसवणूक करीत असल्याचे हे पहा पुरावे.
१). रईस अंसारी म्हणतो की माझे राॅयल पाम्स गेट जवळील घर १९९२ पासून आहे.हे धडधडीत खोटे आहे.मुळात ते त्याचे घर नाही.त्याने ज्याच्याकडून हे घर खरेदी केले त्या तथाकथित शिराड लाडक्या ठाकरे याचे असून रईसने ते एप्रिल २०१६ साली ३,५०,०००/- रूपयांस ( तीन लाख पन्नास हजार रूपयांस) खरेदी केले असून ५००/- रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर खरेदीखत सुध्दा केले आहे.म्हणजेच रईस म्हणतो तसे १९९२ पासून नाही तर २०१६ नंतर तो त्या बेकायदा घराला माझे घर म्हणू शकतो. मुळात शासकीय मालकीच्या जमिनीवरील घराची खरेदी विक्री करण्याचा अधिकार शासना व्यतिरिक्त कुठल्याही खाजगी व्यक्तीला नाही. तसे केल्यास त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो.
२). रईस अंसारीने अर्जासोबत पुरावा म्हणून जोडलेली रेशनकार्डाची झेरॉक्स प्रत ही त्याच्या कार्डाची नसून मयत शिराड लाडक्या ठाकरे याच्या कार्डाची आहे.सदर झेरॉक्स प्रतीवर आधीचा पत्ता न्यू हिलक्वाॅर्टर असा असून तो खोडलेला आहे.म्हणजेच शिराड ठाकरे हा १९९२ साली न्यू हिलक्वाॅर्टर येथे रहात होता. आणि तेथे असतानाच त्याने हे कार्ड काढलेले आहे.मयुरनगरला नाही.म्हणजेच त्यावेळी मयुर नगरला त्याचे घर नव्हते.हे सिद्ध होते.
३). शिराड ठाकरे याचे मयुर नगरच्या १९९३, १९९५, १९९८, २००२, २००२००७, २००९ तसेच २०१४ या वर्षिच्या मतदार याद्या पाहिल्या असता यापैकी कुठल्याच मतदार यादीत त्याचे नाव दिसत नाही.याचा अर्थ हे घर २०१४ नंतर २०१६ च्या दरम्यान बांधलेले असावे.असे त्याने दिलेल्या विजबिलाच्या झेरॉक्स प्रतीवरून वाटते.आणि म्हणून रईस अंसारी म्हणतो तसे राॅयल पाम्स गेट जवळील माझे घर १९९२ पासून आहे. हे खोटे आहे. तसेच २४-८-२०२० च्या दुसऱ्या पत्रात म्हणतो की माझे घर १९९५ पूर्वीचे असून ते संरक्षणपात्र आहे.हे ही खरे नाही.रईस अंसारी धडधडीत खोटे बोलत असून शासनाची दिशाभूल करीत आहे.वरील सर्व बाबींचा विचार करता तेथे घर अस्तित्वातच नव्हते असे वाटते.कारण रईसने ज्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांस घर विकत घेतले तो शिराड लाडक्या ठाकरे हा १९९२ साली न्यू हिलक्वाॅर्टर येथे रहात असल्याचे त्याने पुरावा म्हणून दिलेल्या त्याच्या रेशनकार्डावरून दिसून येते.तर १९९५ साली तो युनिट क्रमांक २५ येथील खांबाचा पाडा येथे कुटुंबासह रहात असल्याचे मतदार यादिवरून दिसते. यावरून रईस अंसारी हा खोटे पुरावे देऊन शासनाची दिशाभूल करीत असल्याचे सिद्ध होते.
४). १९९५ आणि १९९८ च्या मतदार याद्या पाहिल्या असता शिराड लाडक्या ठाकरे हा आपल्या कुटुंबासह युनिट क्रमांक २५ येथील खांबाचा पाडा येथे रहात होता.त्यावेळी त्याच्या सोबत त्याची पत्नी लक्ष्मीबाई शिराड ठाकरे, विनोद शिराड ठाकरे, अनिता विनोद ठाकरे, राजेश शिराड ठाकरे व विलास शिराड ठाकरे हे पाच कुटुंबीय रहात होते.यावरून शिराड ठाकरे याचे रईस अंसारी म्हणतो तसे युनिट क्रमांक २९ मयुर नगर राॅयल पाम्स गेट जवळ घर नव्हते हे सिद्ध होते.
५) शिराड लाडक्या ठाकरे याचा युनिट क्रमांक २५ येथील खांबाचा पाडा येथे दि. ३-९-२०११ रोजी मृत्यू झाला.त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रातील पत्ता देखील युनिट क्रमांक २५ खांबाचा पाडा असाच आहे.यावरून शिराड लाडक्या ठाकरे याचे रईस अंसारी म्हणतो तसे मयुरनगर राॅयल पाम्स गेट जवळ घर नव्हते तर युनिट क्रमांक २५ येथील खांबाचा पाडा येथेच होते.
६). शिराड ठाकरे याचे मयुर नगरच्या १९९३, १९९५, १९९८, २००२, २००७, २००९, तसेच २०१४ यावर्षिच्या मतदार याद्या पाहिल्या असता यापैकी कुठल्याच मतदार यादीत नाव दिसत नाही.याचा अर्थ शिराड लाडक्या ठाकरे याच्याकडून रईस अंसारी याने खरेदी केलेले घर २०१४ पर्यंत अस्तित्वातच नव्हते. हे सिद्ध होते. त्यामुळे रईस अन्सारी म्हणतो माझे राॅयल पाम्स गेट जवळील घर १९९२ पासून आहे. हे खोटे असून तो शासनाची दिशाभूल करीत आहे. हे सिद्ध होते.
७). आरे वसाहतीत असलेल्या झोपड्यांची सिइओ क्रमांक व झोपडी धारकांच्या नावासह विभागवार नोंद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात असते.परंतू रईस अंसारीने ३ लाख ५० हजार रूपये मोजून ज्याच्या कडून झोपडी विकत घेतली त्या शिराड लाडक्या ठाकरे या झोपडीधारकाचे नाव मयुर नगर येथे तर नाहीच पण रेशनकार्डावर पत्ता असलेल्या न्यू हिलक्वाॅर्टर येथील सीइओ यादीतही त्याचे नाव नाही.
या सर्व प्रकरणाकडे बारकाईने पाहिल्यास रईस यासीन अन्सारी याने खरेदी केलेले घर शिराड लाडक्या ठाकरे याने सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेले बेकायदा घर आहे.म्हणजेच एका दृष्टीने शासकीय मालमत्तेची चोरी केली आहे.आणि चोरीची मालमत्ता चोरीची वस्तू खरेदी करणे किंवा जवळ बाळगणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे.
रईस अंसारीने ते बेकायदा घर विकत घेऊन शासनाची फसवणूक केली असल्याने आरे प्रशासनाने ते घर ताब्यात घेऊन शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याबद्दल कारवाई करणे आवश्यक आहे.तसेच शिराड लाडक्या ठाकरे याने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा घर बांधणे आणि स्वतःच्या फायद्यासाठी ते परस्पर खाजगी व्यक्तीला साडेतीन लाख इतक्या मोठ्या रकमेस विकणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे.
या सर्व गोष्टी धुरी यांनी दुग्ध खात्याच्या व पोलीस विभागाच्या समोर आणून दिल्या असताना देखील कारवाई का होत नाही ? असा प्रश्न त्यांना पडला आहे.











































