Home महत्वाची बातमी तो गेला अन तिच्या पाठो पाठ ती ही गेली ???

तो गेला अन तिच्या पाठो पाठ ती ही गेली ???

825

प्यार हो तो ऐसा ????

 

अमीन शाह ,

पुणे ,

कोरोनामुळे पतीचं निधन झाल्यानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरी नजीकच्या फुलेनगर परिसरात शुक्रवारी (१८ सप्टेंबर) सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली असून, आई वडिलांच्या जाण्याने दोन मुलं पोरकी झाली आहेत.
गोदावरी गुरुबसप्पा खजुरकर (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती गुरुबसप्पा उर्फ प्रकास खाजुरकर (वय ३५) यांचे दोन महिन्यांपूर्वी १८ जुलैला निधन झाले. गुरुबसप्पा हे टिव्ही फिटींग आणि इंस्टॉलेशनचे काम करीत होते. त्यांच्यावरच घराचा उदरनिर्वाह चालत असे. पत्नी गोदावरी या देखील काही कामे करून त्यांना हातभार लावत होत्या. अवघ्या पस्तीसाव्या वर्षात गुरुबसप्पा यांना कोरोनाने गाठले. त्यांच्यावर उपचार केले जात होते.
महात्मा फुले नगर वसाहतीतील लोकांनी देखील त्यांना चांगले उपचार मिळावे म्हणून, प्रयत्न केले. मात्र, त्यांचा उपचारादम्यान १८ जुलैला मृत्यूने गाठले. अकरा वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आणि आई – पत्नी असा परिवार मागे सोडून गुरुबसप्पा गेल्याने कुटुंब रस्त्यावर आले. पतीच्या जाण्याने पुढे करायचे काय हा प्रश्न आ वासून उभा असतानाच विरह सहन होत नसल्याने गोदावरी यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत १०९५ लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. अनेक संसार आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आई आणि वडील हे जग सोडून गेल्याने ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. घरात आता दोन्ही मुलं आणि त्यांची आजी असे कुटुंब आहे.
शिवसेना शहर संघटक सुलभा उबाळे यांनी या दोन्ही मुलांचा पुढील सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. तर या परिसरातील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे हे या दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण करणार आहेत. गोदावरी यांचे माहेरचे लोक आज संध्याकाळी सोलापूर कर्नाटक सीमेवर असलेल्या गावातून शहरात येणार आहेत. त्यानंतर गोदावरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.